मध आणि दालचिनीच्या एकत्रित सेवनाचे फायदे


मध आणि दालचिनीच्या एकत्रित सेवनाने पुष्कळ विकारांमध्ये गुण येत असल्याचे आयुर्वेदाने सिद्ध केले आहे. या मिश्रणाच्या नियमित सेवनाने पोट बिघडणे, सर्दी-खोकला, सांधेदुखी, ब्लॅडर इन्फेक्शन सारख्या विकारांमध्ये गुण येतो. याच कारणामुळे या विकारांसाठी औषधे घेण्याऐवजी मध-दालचिनीच्या मिश्रणाचे सेवन अधिक गुणकारी मानले गेले आहे. प्रत्येक घरामध्ये अगदी हटकून सापडणारे असे हे दोन्ही पदार्थ आहेत. मध आणि दालचिनीचे मिश्रण ज्युसमधून घेता येईल, किंवा त्याचे चाटण बनवून किंवा काढा बनवून ही ह्या मिश्रणाचे सेवन करता येऊ शकते.

दालचिनी आणि मध या मिश्रणाच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे बदलत्या हवामानामुळे उद्भविणारी व्हायरल संक्रमणे शरीराला त्रास देऊ शकत नाहीत. दालचीनीमुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण नियंत्रित राहते. टाईप २ प्रकारचा मधुमेह असलेल्या रुग्णांना या मिश्रणाच्या सेवनाने लाभ होतो. ज्या व्यक्तींना सांधेदुखी सतावत असेल, त्यांनी अर्धा लहान चमचा आणि तेवढाच मध याचे मिश्रण कोमट पाण्याबरोबर काही दिवस घ्यावे. त्याने सांधेदुखीचे प्रमाण पुष्कळ अंशी कमी होईल. जर हे मिश्रण खाण्याची इच्छा नसेल, तर हे मिश्रण दुखऱ्या सांध्यांवर लावल्याने देखील गुण येईल. सांधेदुखी पासून आराम मिळविण्यासाठी या मिश्रणाचे नियमित सेवन करावे.

तीन चमचे दालचिनी पावडर मध्ये दोन चमचे मध मिसळून या मिश्रणाचे कोमट पाण्यासोबत नियमित सेवन केल्याने शरीरातील कोलेस्टेरोलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच ब्लॅडर किंवा मूत्राशयाचे इन्फेक्शन असल्यास दररोज दोन चमचे दालचिनी पूड आणि एक चमचा मध असे मिश्रण करून त्याचे सेवन करावे. ह्या मिश्रणाचे सेवन जितके दिवस चालू असेल, तितके दिवस आंबट फळे, मद्य आणि कॉफीचे सेवन पूर्णपणे बंद करावे.

या मिश्रणाच्या सेवनाने वजन घटविण्यासही मदत मिळते. या साठी दिवसातून तीन वेळा दालचिनी पूड आणि मधाच्या मिश्रणाचे सेवन गरम पाण्यासोबत करावे. सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर हे मिश्रण एकदा घ्यावे. त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर आणि त्यानंतर रात्रीचे भोजन झाल्यानंतर या मिश्रणाचे सेवन करावे. या मिश्रणाच्या सेवनाने शरीरातील चरबी हळूहळू घटू लागते आणि वजन घटण्यास सुरुवात होते.

त्वचेवर जर सतत खाज सुटत असेल, किंवा कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल, दालचिनी-मधाच्या मिश्रणाचे सेवन अवश्य करायला हवे. मध आणि दालचिनी त्वचेला हानी पोहोचविणाऱ्या किटाणूंना नष्ट करते. हे मिश्रण खाण्याऐवजी जिथे सतत खाज सुटत असेल, तिथे लावल्याने ही गुण येतो.