अनेकदा सतत नेल पॉलिश लावल्याने किंवा वारंवार हात पाण्यामध्ये घालावा लागत असल्याने, स्वयंपाक करताना सतत मसाल्यांमध्ये हात जात असल्याने हातांची नखे पिवळसर दिसू लागतात. अश्या पिवळ्या नखांमुळे तुमचे हात अनाकर्षक दिसू लागतात. नखांचा पिवळेपणा घालविण्यासाठी पार्लरमध्ये धाव न घेता घरच्याघरी काही सोपे उपाय अवलंबता येतील. या उपायांचा अवलंब केल्याने नखांचा पिवळेपणा जाऊन नखे शुभ्र तर होतीलच, शिवाय त्यांच्या आसपास असलेले फंगसही हटेल. अशी शुभ्र, स्वच्छ नखे नेल पॉलिश न लावता देखील आकर्षक दिसू लागतील.
एक कप गरम पाण्यामध्ये एक मोठा चमचा व्हाइट व्हिनेगर घालावे. या मिश्रणामध्ये हातांची बोटे दहा मिनिटे बुडवून ठेवावीत. त्यानंतर हात स्वच्छ पाण्याने धुवावेत. व्हिनेगर मुळे तुमच्या नखांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल. स्वछ पाण्याने हात धुतल्यानंतर नखांच्या आसपास चांगल्या प्रतीचे मॉईश्चरायझर लावावे. नखांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी व्हिनेगर ऐवजी बेकिंग सोडा चा वापर करता येऊ शकतो.
बेकिंग सोडाचा वापर करण्यासाठी एक चमचा थंड पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा घालून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट आपल्या नखांवर लावून साधारण वीस मिनिटे राहू द्यावी. वीस मिनिटांनंतर हात स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि नखांना मॉईश्चरायझर लावावे. नखांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग करता येईल. या साठी लिंबाचा रस लढून घेऊन हा रस नखांना लावावा. हा रस दहा मिनिटे नखांवर राहू देऊन त्यानंतर हात पाण्याने धुवून टाकावेत. हाताच्या नखांप्रमाणेच पायांच्या नखांचा पिवळेपणा देखील या उपायांनी दूर करता येऊ शकतो.