गारपीटीचे संकट


शेतकरी चांगले पीक घेतो पण पीक चांगले येऊनही तो संकटात असतो कारण जादा धान्य पिकले की त्याचे भाव कोसळतात. कमी पिकल्यास तर तो जादाच अडचणीत येतो कारण कमी पिकल्यास त्याला तोटा होतो. पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही. हा तर जमा खर्चाचा मामला असतो पण काही वेळा सारा खर्च केलेला असतो आणि पीकही चांगले आलेले असते अशा वेळी नेमके पीक हातातोंडाशी आले असतानाच गारपीटीसारखे संकट कोसळते. तेव्हा शेतकरी मुळापासून हादरून जातो. शेतकरी अनेक प्रकारच्या नुकसानीला आणि नैसर्गिक संकटांना झेलतच जगत असतो पण आता होत असलेल्या गारपीटीच्या संकटाची तर्‍हा फारच न्यारी आहे. तिच्याने शेतकरी फार उद्ध्वस्त होत आहे.

कष्ट करून पिकवलेली शेती आता हातात पैसा देईल अशी आशा करत असतानाच सारे पीक मातीत घालणारी ही मोठी विचित्र गारपीट होत आहे. तीन वर्षाखाली पहिल्यांना गारपीट झाली. हा प्रकार आपल्याला पूर्णपणे अनोळखी होता कारण आपल्याला कमी पाऊस पडणे किंवा जादा पाऊस पडणे ही नेहमीची संकटे माहीत आहेत पण असली गारपीट आणि तीही उन्हाळा तोेंडावर आला असताना होणे हे नवेच होते. हवामान तज्ज्ञांनी असा प्रकार दोनशे ते तीनशे वर्षात एकदा घडतो असा निर्वाळा दिला. याच तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आता निदान पुढची दोन तीनशे वर्षे तरी असा प्रकार घडायला नको होता. पण ही आपत्ती तीन चार वर्षातच आदळली आहे.

अशा संकटात सरकार शेतकर्‍यांना मदत करते. पण ती मदत म्हणजेसुद्धा सुलतानी संकटच असते. इतक्या तर्‍हांना तोेंड दिल्यानंतर सरकारची भरपायी हातात पडते. आपण अनेक सरकारी सेवांचे संगणकीकरण करीत आहोत पण शेतकर्‍यांना अशा संकटात दिली जाणारी मदत देण्याचे काम मात्र संगणकावर सोपवत नाही. अमेरिकेत अशा संकटांत शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी अवकाशातल्या उपग्रहांमार्फत काही तासांत होते आणि दोन तीन दिवसांत भरपायीची रक्कम त्या त्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होते. भारतातले शेतकरी एवढे सुखी कधी होतील ? त्याला अशा भरपायीसाठी शासनाच्या खाय खाय करणार्‍या पायांना हात लावावा लागू नये असे कधी होईल ? आसमानी संकट टाळणे हे काही आपल्या हातात नाही पण ते आसमानी संकट कोसळल्यानंतरचे त्याच्या मनाला डागण्या देणारे सुलतानी संकट तरी आपण सौम्य करायला हवे आहे.

Leave a Comment