येथे आहे महादेवाच्या मेहुण्याचे एकमेव मंदिर


आज देशभर महाशिवरात्र साजरी होत आहे. देशातील सर्व शिवालायातून हा सोहळा साजरा होत आहे. वाराणसी भोलेनाथाची नगरी म्हणून ओळखली जाते. मात्र या भोलेबाबांच्या मेहुण्याचे मन्दिर येथून अगदी जवळ असूनही बऱ्याचजणांना त्याची माहिती नाही. काशीपासून जवळ असलेल्या सारनाथ येथे हे एकमेव मंदिर असून ते सारंगनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात मेहुणा सारंगयाच्या बरोबर स्वतः भोलेनाथही विराजमान आहेत.

यामागे अशी कथा सांगतात की, मह्देवांचा विवाह दक्ष राजाची मुलगी सती हिच्याबरोबर झाला तेव्हा तिचा भाऊ ऋषी सारंग उपस्थित नव्हता. आपल्या बहिणीचा विवाह एका भणंगाबरोबर झाल्याने तो नाराज होता. कपडा नाही, दागिने नाहीत असल्या गरिबाला बहिण दिल्याने तो दागदागिने, कपडालत्ता घेऊन बहिणीकडे निघाला व वाराणसी बाहेर सारनाथ येथे त्याने मुक्काम केला. रात्री स्वप्नात त्याला वाराणसी नगरी सोन्याची असल्याचे दिसले. जागा झाल्यावरही तेच दृश्य दिसले तेव्हा त्याला पश्चाताप झाला व तो तेथेच तपश्चर्येला बसला. हजारो वर्षाच्या तपानंतर त्याला महादेव प्रसन्न झाले आणि वर मागायला सांगितले. तेव्हा सारंगने तुम्ही माझ्यासोबत राहा असा वर मागितला.

यानंतर येथे दोन स्वयंभू शिवलिंगे तयार झाली. त्यातील एक सारंगनाथ व दुसरे सोमनाथ म्हणून पूजले जाऊ लागले. सारंगनाथाची पिंड लांबीला अधिक आहे तर महादेवाची पिंड उंचीला अधिक आहे.

असेही सांगतात की २४०० वर्षापूवी बौद्ध धर्माचा प्रसार वाढू लागला तेव्हा आदि शंकराचार्यांनी येहते बौद्ध गुरूंशी वादविवाद करून त्यांना हरविले आणि शिवलिंगे स्थापन केली. या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. येथे लग्नानंतर लगेच दर्शन घेतले तर सासर माहेरातील संबंध चांगले राहतात असे मानले जाते. तसेच मेहुण्याबरोबर नाते मधुर होते. येथे दर्शन केल्यावर त्वचा रोग बरे होतात व ४१ सोमवार दर्शन केले तर सोन्या संबंधातील इच्छा पूर्ण होतात असाही समज आहे.

Leave a Comment