पर्यटकांसाठी धुरांच्या रेषा काढत धावणार झुकझुकगाडी


पहाडी भागात वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या रेल्वे गाड्या लोकप्रिय ठरल्यामुळे आता दिल्ली रिंग रेल्वेवरही या झुकझुक गाड्या धुरांच्या रेषा हवेत सोडत पुन्हा धावणार आहेत. वाफेच्या इंजिनावर धावणाऱ्या रेल्वे पुनर्जीवित करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून खास पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होत असल्याचे दिसून आले आहे.

कांगडा व्हॅलीत पालनपुर जोगिंदरनगर मार्गावर या झुकझुक गाडीने यशस्वी मार्गक्रमणा केल्यानंतर पहाडी भागात या गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कांगडा व्हॅली युनेस्कोच्या संभावित जागतिक वारसा यादीत आहे. येथे २० वर्षानंतर पुन्हा वाफेचे इंजिन धावले आहे यामुळे हिमाचल मधील पर्यटनाला उत्तेजन मिळताना दिसून आले आहे. दार्जीलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे नियमित वाफेच्या इंजिनावर धावत आहेत. कालका सिमला, माथेरान हिल रेल्वे मार्गावर पर्यटकाच्या मागणीवरून वाफेची इंजिन धावत आहेत. दिल्लीतील दीर्घकाळ उपेक्षित पण त्याकाळी लोकप्रिय असलेल्या रिंग रोडवर त्यामुळेच पुन्हा वाफेच्या इंजिनासह रेल्वे धावणार असल्याचे समजते.

Leave a Comment