पुरंदरेंच्या शिवसृष्टीला आमचा विरोध – जितेंद्र आव्हाड


मुंबई – जिजाऊंचा ब्रिटिश लेखक जेम्स लेनने केलेला अपमान ही इतिहासकार बाबासाहेब पुरंदरेंचीच फूस असल्यामुळे आमचा शिवप्रेमींना खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला विरोध असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

आम्ही बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहासकार मानतच नाही असे सांगताना ही शिवसृष्टी देशभरातील इतिहास संशोधकांची समिती नेमून साकारावी अशी मागणी देखील आव्हाड यांनी केली आहे. आम्हाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्रीही दैवतासमान आहेत. पुरंदरे यांनी त्या माऊलीची बदनामी केली. राज्य सरकारने त्याच पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण देऊन सन्मान केला. महाराजांचा आणि माऊलींचा हा अपमानच असल्याचे आव्हाड यावेळी म्हणाले.

पुरंदरेंच्या संकल्पनेतील शिवसृष्टीला सरकारने ३०० कोटी देऊन त्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केल्याचेही आव्हाड यांनी म्हटले आहे. ते या शिवसृष्टीच्या माध्यमातून खोटा इतिहास मांडून राजमातेची बदनामी करतील, अशी आम्हाला शंका असल्यामुळे पुरंदरे यांना शिवसृष्टीपासून सरकारने लांबच ठेवावे अशी आमची मागणी देखील आव्हाड यांनी केली आहे. सरकारने जर तमाम शिवप्रेमींच्या भावनांची कदर न करता पुरंदरेंचीच संकल्पना राबवली तर आम्ही ते सहन करणार नाही हे सांगतानाच शिवसुष्टीला विरोध करण्याची रणनीती आम्ही लवकरच जाहीर करणार असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.

Web Title: We are not supporting shiv srushti of babasaheb purandare - Jitendra Awhad