…अन् ट्रम्प यांच्या सूनबाईंना रुग्णालयात दाखल


न्यूयॉर्क: सोमवारी एका संशयास्पद लिफाफ्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सून व्हेनेसा ट्रम्प यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. हा लिफाफा डोनाल्ड ट्रम्प यांचे पूत्र आणि व्हेनेसा यांचे पती डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या मॅनहटन येथील घराच्या पत्त्यावर पाठवण्यात आला होता. हा लिफाफा व्हेनेसा यांनी उघडला तेव्हा त्यामध्ये सफेद रंगाची पावडर आढळून आल्यामुळे घातपाताची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा लगेच सतर्क झाल्या. सुरक्षारक्षकांडून लिफाफा उघडताना त्याठिकाणी हजर असणाऱ्या दोन व्यक्तींना आणि व्हेनेसा यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण प्राथमिक तपासणीनंतर या पावडरमुळे त्यांच्या आरोग्याला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेची माहिती डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी ट्विट करून दिली. व्हेनेसा आणि माझी मुले आजच्या भीतीदायक घटनेनंतर सुरक्षित आहेत. घृणास्पद पद्धतीने काही लोक आपला विरोध व्यक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले. तर या घटनेनंतर व्हेनेसा ट्रम्प यांनी तत्परता दाखवणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानले. तर दुसरीकडे ट्रम्प यांची कन्या इव्हांका यांनीही व्हेनेसा यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मी अशावेळी व्हेनेसासोबत असायला पाहिजे होतं. कोणालाही अशा पद्धतीने घाबरवणे योग्य नसल्याचे इव्हांका यांनी सांगितले.