भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मुस्लीमांच्या नमाजवर बंदी


त्रिपुरा – त्रिपुरामधील एका स्थानिक मशिदीने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या मुस्लीमांना वाळित टाकले असून त्यांना मशिदीत प्रवेश बंदी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुस्लीमांना त्यामुळे वेगळी मशिद बांधावी लागली आहे.

यासंदर्भातील वृत्त जनसत्ताने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार मोईदातिला नावाचे गाव दक्षिण त्रिपुरामध्ये असून ८३ कुटुंब जिथे मुस्लीमांची आहेत. येत्या निवडणुकांमध्ये भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय यापैकी २५ कुटुंबांनी घेतला आहे. या २५ मुस्लीम कुटुंबांनी आम्ही भाजपचे कार्यकर्ते असल्याचा दावाही केला आहे. पण त्यांना अन्य मुस्लीमांनी यामुळे वेगळी वागणूक दिली असून गावातील मशिदीत त्यांना नमाज पढण्यास मनाई करण्यात आली आहे. परिणामी त्यांनी वेगळी मशिद बांधली असून आता या लहानशा गावात दोन मशिदी झाल्या आहेत.

या २५ मुस्लीम कुटुंबांनी १६ महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून आमच्यावर मशिदीमध्ये नमाज पढण्यास मज्जाव करण्यात आल्याचे बाबुल हुसेन यांनी सांगितले. हिंदुत्ववादी पक्षाला जोपर्यंत समर्थन द्याल तोपर्यंत येथे नमाज पढता येणार नाही असे त्यांना सांगण्यात आले आहे. परिणामी या लोकांनी पत्र्याची एक वेगळी मशिद बांधली आहे.