भाजप नेत्याचा अजब सल्ला; हनुमान चालिसा वाचा आणि नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करा


भोपाळ (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशमधील भाजपच्या नेत्याने अवकाळी पाऊस किंवा गारपिटीच्या समस्यांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला असून भाजपचे नेते रमेश सक्सेना यांनी जर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करायचा असेल, तर हनुमान चालिसा हाच एकमेव मार्ग असल्याचे म्हटले आहे.

पुढे रमेश सक्सेना म्हणाले, रोज एक तास सर्व गावातील शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या हनुमान चालिसा वाचावी, जेणेकरुन नैसर्गिक आपत्ती ओढवणार नाही. हनुमान चालिसा वाचल्यास गारपीट किंवा कोणतेही नैसर्गिक संकट येणार नाही, असा माझा दावा आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे कृषिराज्य मंत्री बालकृष्ण पाटीदार यांनीही भाजप नेत्याच्या या अजब सल्ल्याचे समर्थन केले आहे. कृषिराज्य मंत्री म्हणाले, माणूस नैसर्गिक आपत्तींना जबाबदार नाही. हनुमान चालिसा वाचायलाच हवी. कारण हनुमान संकटमोचक असल्यामुळे सक्सेना यांनी काही चुकीचे म्हटले नाही.

काँग्रेस प्रवक्त्यानेही भाजप नेते आणि कृषिराज्य मंत्री या दोघांच्या अजब सल्ल्यावर अजब विधान केले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते के. के. मिश्रा म्हणाले, रमेश सक्सेना भाजपचे धडाकेबाज नेते असून देवांमध्येच त्यांच्या सल्ल्यामुळे आपापसात वाद होईल. सक्सेना म्हणतात कि, हनुमान चालिसा वाचावी, मात्र मध्य प्रदेशात तर शिव शंकराची उपासना केली जाते. त्यामुळे त्यांचे विधान चूकीचे आहे.

Web Title: Strong advice of BJP leader; Read Hanuman Chalisa and protect yourself from natural disaster