नाशिक पालिकेच्या भिंतींवर आता महापुरुषांचेच फोटो


नाशिक: नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार आपल्या बेधडक कार्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यापासूनच संबंधितांना धक्के द्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी नुकताच एका सरकारी निर्णयाचा आधार घेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देवी-देवतांचे फोटो लावून कामकाज करण्यावर बंदी घातली आहे. मुंढे यांच्या अल्टिमेटमनुसार महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटीचे दोन दिवस कार्यालयात येऊन महापालिका कार्यालयाची स्वच्छता केली. आता पालिकेच्या भिंतींवर महापुरुषांचेच फोटो राहणार आहेत.

आयुक्तांच्या स्वीय सचिवांच्या कक्षात असलेली दत्ताची तसबिर या आदेशानंतर काढण्यात आली तर अन्य अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातील तसबिरी हटविल्या. देवबंदी करत मुंढे यांनी न्यायालयाच्या निर्देशाचे पालन केले असले तरी त्यानिमित्ताने श्रद्धेला हात घालून ‘पारदर्शक’ कारभार होईल काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्याचबरोबर अधिका-यांनी कार्यालयात येताना जीन्स पँट, टी-शर्ट घालून येऊ नये, फॉर्मल ड्रेसमध्येच यावे, पायात स्पोर्ट शूज नकोत,असे आदेशही मुंढे यांनी दिल्याचे समजते.

अधिकारी वर्ग त्यामुळे धास्तावला असून ड्रेस-शूज आणि प्रशासकीय कामकाजाची घालण्यात आलेली सांगड चर्चेचा विषय बनली आहे. मुंढे यांनी राजीव गांधी भवनमधील प्रवेशद्वारावर लागणा-या दुचाकीही हटविण्याचे निर्देश दिल्याचे समजते. त्याचबरोबर त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना परस्पर प्रसारमाध्यमांशी बोलण्यावरही बंदी घातली आहे. यावरून मुंढे यांनी प्रसिद्धीचा झोत केवळ आपल्यावरच राहण्याची केलेली ही योजकता मुंढे यांच्या अंगलट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.