बँकेच्या कर्जासाठी व्यवस्थापकाशी मैत्री, तरुणी गरोदर


बँकेच्या कर्ज प्रकरणादरम्यान बँक मॅनेजरशी मैत्री करणाऱ्या तरुणीने त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहण्यास सुरूवात केली. मात्र या तरुणीला दिवस गेल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. पंजाबमध्ये ही घडली असून या तरूणीने व्यवस्थापकाच्या विरोधात तक्रार दिली आहे.

मोहाली येथील या तरुणीला परदेशी जायचे होते व त्यासाठी तिला कर्ज हवे होते. याच दरम्यान तिची आंध्र बँकेच्या पंचकुला शाखेच्या अर्जुन चौहान या व्यवस्थापकाशी मैत्री झाली. त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली, की ते दोघे एकत्र राहू लागले. त्याने तिला लग्नाचे वचन दिले होते, मात्र ती गरोदर झाल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

चौहान याचा आधी साखरपुडा झाला होता. मात्र त्याच्या वाग्दत्त वधूशी संबंध तोडून या तरुणीशी लग्न करण्याचे वचन त्याने दिले होते, असा तिचा दावा आहे.

या संबंधात तिने अन्य एका ठाण्यात तक्रारही केली होती मात्र पोलिसांनी त्यावर कारवाई केली नाही, असा आरोप करून तिने मोहालीच्या वरिष्ठ उप अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. माझे लग्न अर्जुन चौहान याच्याशी करून द्यावे किंवा त्याच्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही तिने केली आहे.

मला न्याय मिळाला नाही तर उप अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर उपोषण करेन, अशी धमकीही तिने दिली आहे.