कृष्णा कुमारी होऊ शकतात पाकिस्तानातील पहिल्या हिंदू महिला खासदार


कराची : सिनेटसाठी पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पाकिस्तानात नवा इतिहास रचला जाण्याची शक्यता असून हिंदू महिलेला पाकिस्तान पिपल्स पार्टीतर्फे उमेदवारी देण्यात आल्यामुळे पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून प्रथमच हिंदू महिलेस पाकिस्तानच्या संसदेत जाता येणार आहे. कृष्णा कुमारी यांना ही संधी सिंध प्रांतामधून मिळत असून ३ मार्च रोजी पाकिस्तान संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी निवडणुका होत आहेत. ‘पीपीपी’ने कृष्णा कुमारी यांना विजयी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

सिंध प्रांतातील थर विभागातील कृष्णा कुमारी या असून नगरपारकर जिल्ह्याच्या त्या रहिवासी आहेत. रुपलू कोल्ही या स्वातंत्र्यसैनिकाच्या त्या वंशज आहेत. ब्रिटीश फौजांनी १८५७ साली सिंध प्रांतावर हल्ला केला होता तेव्हा रुपलू यांनी ब्रिटिशांविरोधात लढा दिला होता. पीपीपी पक्षाद्वारे सामाजिक कार्य करणाऱ्या कृष्णा यांनी राजकारणात प्रवेश केला. याच पक्षात त्यांचे बंधूही असून ते बेरानो शहराचे नगरप्रमुख होते. अत्यंत गरीब कुटुंबात कृष्णा कुमारी यांचा जन्म झाला. सोळा वर्षांच्या असताना लालचंद यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांनी विवाहानंतरही शिक्षण सुरुच ठेवले. सिंध विद्यापीठातून समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली.

सिंध प्रांतात शिक्षण प्रसाराचे मोठे कार्य कृष्णा यांनी केले आहे. ही संधी पक्षाने आपल्याला दिल्याबद्दल त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधानपद ‘पीपीपी’च्या सदस्या बेनझीर भुट्टो यांनी भुषवले होते. तर हिना रब्बानी खार यांनी परराष्ट्रमंत्री आणि फेहमिदा मिर्झा यांनी पहिल्या महिला सभापती होण्याचा मान मिळवला होता.

Web Title: Krishna Kumari may become the first Hindu woman MP in Pakistan