लोया यांच्या मृत्यूविषयी शंका घेणे चुकीचे – महाराष्ट्र सरकार


नवी दिल्ली – न्यायमूर्ती लोया यांच्या कथित मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली असून घटनेच्या दिवशी लोया यांच्या समवेत असेलल्या चारही न्यायाधीशांनी त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले. न्यायाधीशाचे म्हणणे निर्विवाद असल्यामुळे लोया यांच्या मृत्यूविषयी शंका घेणे चुकीचे असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

सोमवारी मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. महाराष्ट्र सरकारच्या वतीने वरिष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रोहतगी यांनी खंडपीठासमोर बोलताना न्यायाधीश जे. कुलकर्णी, जे. बर्डे, जे. आर. राठी यांनी न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले. तसेच चारही न्यायाधीश २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१४ दरम्यान त्यांच्या सोबत होते. त्यामुळे न्यायालयाने चारही जणांचे म्हणणे खोटे ठरवले, तर सकृतदर्शनी ते कटात सहभागीदार ठरतील, असेही रोहतगी म्हणाले.

न्यायालयासमोर बोलताना मुकुल रोहतगी यांनी जनहित याचिकेबाबत सर्वंकष धोरण ठरविण्याची गरज असल्याचे म्हटले. जनहित याचिका केवळ वर्तमानपत्रातील बातम्या, किंवा ऐकीव माहितीच्या आधारे न्यायालयात दाखल केल्या जातात. त्यामुळे न्यायालयाने जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी याचिकाकर्त्यांची विश्वासार्हता तपासायला हवी. तसेच न्यायमूर्ती लोयाप्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे रोहतगी यांनी म्हटले आहे.

Web Title: It is wrong to doubt the death of Justice Loya - the Government of Maharashtra