गर्भावस्थेमध्ये थायरॉइड संबंधी समस्या उद्भविल्यास ..


महिलांना गर्भावस्थेच्या काळामध्ये अनेक टेस्ट्स करून घेणे आवश्यक असते. या टेस्ट्स मुळे गर्भावस्थेमध्ये असताना इतर काही विकार असल्यास त्यांचे योग्य आणि वेळशीर निदान होऊ शकते. अश्या टेस्ट्सच्या द्वारे थायरॉइड संबंधी समस्या असल्यास त्यांचे निदान होण्यास ही मदत होऊ शकते. त्यामुळे गर्भावस्थेमध्ये देखील योग्य उपचारपद्धतीने थायरॉइडशी निगडीत समस्येवर नियंत्रण ठेवता येणे शक्य होते. थायरॉइड ग्रंथीच्या कार्याशी निगडीत समस्या उद्भविल्यास हा विकार उद्भवू शकते. काहींच्या बाबतीत थायरॉइड ग्रंथी कमी प्रमाणात सक्रीय असल्याने हार्मोन्सचे नियंत्रण बिघडते, तर काहींच्या बाबतीत थायरॉइड ग्रंथी ही जास्त सक्रीय असल्याने देखील समस्या उद्भवू शकतात. या संबंधी तपासणी करून घेतल्यावर या विकाराचे निदान होऊ शकते.

गर्भावस्थेच्या दरम्यान महिलांच्या शरीरामध्ये अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे थायरॉइडसंबंधी लक्षणांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर थायरॉइड संबंधी समस्या शरीरामध्ये उद्भवली असेल, तर शरीरावर सूज येणे, सतत थकवा जाणाविणे, स्नायूंमध्ये शिथिलता किंवा अशक्तपणा जाणविणे, व्यवस्थित झोप न लागणे, झपाट्याने वजन वाढणे, आवाजामध्ये जडपणा जाणविणे किंवा आवाज घोगरा होणे, डोळे आणि चेहऱ्यावर सूज, डोकेदुखी, मानेमध्ये वेदना किंवा सतत हातपाय दुखणे अश्या प्रकारची लक्षणे जाणवू शकतात.

गर्भावस्थेच्या काळामध्ये पचनक्रिया सुरळीत काम करणे अतिशय आवश्यक असते. त्यामुळे ज्या गर्भवती महिलांना थायरॉइड संबंधी समस्या असतील, त्यांनी आपल्या आहारामध्ये फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करणे इष्ट आहे. असे केल्याने बद्धकोष्ठाचा त्रास होणार नाही. थायरॉइड संबंधी समस्या असल्यास बहुतेकवेळा बद्धकोष्ठ असण्याची शक्यता असते, आणि गर्भावस्थेमध्ये बद्धकोष्ठ वाढण्याचा संभव असतो. त्यामुळे खासकरून गर्भावस्थेमध्ये फायबर युक्त आहार घ्यावा. तसेच, दररोज किमान अर्धा तास हलका व्यायम घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहील, आणि थायरॉइडवर नियंत्रण ठेवता येणे शक्य होईल.

ज्या महिलांना गर्भावस्थेच्या आधीपासूनच थायरॉइड संबंधी समस्या आहेत, त्यांनी वेळोवेळी आपली तपासणी करून घेणे चांगले. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे सेवन करावे. गर्भवती महिलांनी आपल्या आहारामध्ये टोमॅटो, कांदे, लसूण, हिरव्या पालेभाज्या, शहाळ्याचे पाणी यांचा समावेश करावा. तसेच बाजारामध्ये मिळणाऱ्या रीफाइंड मीठाऐवजी सैंधव वापरावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment