अखेर पाकने हाफिज सईदला केले दहशतवादी घोषित


कराची – पाकिस्तानने मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला मोठा झटका दिला असून पाकिस्तानने सईद व त्याची दहशतवादी संघटना जमात उद दावाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेद्वारे (यूएनएससी) प्रतिबंधित व्यक्ती आणि लष्कर ए तोयबा, अल कायदा तसेच तालिबानसारख्या संघटनांना लगाम घालण्याचा उद्देश असलेल्या एका अध्यादेशावर स्वाक्षरी केली असून हाफिज सईदची दहशतवादी संघटना जमात उद दावाचाही या सूचीत समावेश आहे.

जमात उद दावासारख्या संघटनांचा आतापर्यंत पाकिस्तानने फक्त दहशतवादी संघटनांच्या सूचीत समावेश केला होता. कधी बंदीची चर्चा पाकिस्तानकडून केली जाते तर कधी या संघटनेला देणगी घेण्यावर बंदी लादण्याची चर्चा केली जाते. पण राष्ट्रपतींद्वारे आता अध्यादेशावरील स्वाक्षरीनंतर जमात उद दावा अधिकृतरित्या दहशतवादी संघटना ठरली आहे. पॅरिस येथे फायनान्शियल टास्क फोर्सची बैठक यामागे होणार आहे. मनी लाँडरिंगसारख्या विविध प्रकरणांवरून यामध्ये विविध देशांवर निगराणी ठेवली जाते. पाकिस्तान त्यापूर्वीच स्वत:ला स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.

राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्याने याबाबत विस्तृत माहिती देण्यास नकार दिला आहे. पण या वृत्ताला त्याने दुजोरा दिला आहे. अल कायदा, तहरिक ए तालिबान पाकिस्तान, लष्कर ए झांगवी, जमात उद दावा, फलाह ए इन्सानियत फाउंडेशन, लष्कर ए तोयबा आणि इतर संघटनांचा यूएनएससीच्या प्रतिबंधित सूचीत समावेश आहे.

Web Title: Eventually Pakistan has declared Hafeez Saeed as a terrorist