देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री – सर्वेक्षण


नवी दिल्ली – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये अव्वल स्थानी असून सर्वात गरीब मुख्यमंत्री त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे ठरले आहेत. फक्त २६ लाख रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे आहे. तर सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत.

असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्राशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करुन हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. सर्वात गरीब मुख्यमंत्री त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे ठरले आहेत. फक्त २६ लाख रुपयांची संपत्ती माणिक सरकार यांच्याकडे आहे. तर ३० लाख रुपयांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे आणि ५५ लाख रुपयांची संपत्ती जम्मू- काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे आहे. एक कोटी रुपयांपेक्षा कमी संपत्ती देशातील १९ टक्के मुख्यमंत्र्यांची आहे. तर १ कोटी ते १० कोटी रुपयांदरम्यान ५५ टक्के मुख्यमंत्र्यांची संपत्ती आहे. सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे असून १७७ कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे आहे. त्याखालोखाल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा समावेश होतो. त्यांच्याकडे १२९ कोटी रुपयांची तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावावर ४८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. देशातील २५ मुख्यमंत्री कोट्यधीश असल्याचे एडीआरच्या पाहणीतून समोर आले आहे.

सर्वाधिक गुन्हे (२२) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दाखल आहेत. यात तीन गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहेत, तर ११ गुन्हे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यावर दाखल आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर १० गुन्हे दाखल आहेत. ३१ पैकी २० मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड स्वच्छ असून आठ मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. देशातील ३९ टक्के मुख्यमंत्री हे पदवीधर असून १६ टक्के मुख्यमंत्री हे पदव्यूत्तर शिक्षण घेतलेले आहेत. सिक्कीमचे मुख्यमंत्री पी.के. चामलिंग यांच्याकडे डॉक्टरेट आहे.

Web Title: Devendra Fadnavis is the Chief Minister who is the top criminal