झोप आणि आरोग्य यांचा परस्परसंबंध


आपला मेंदू आणि शरीरातील इतर अवयवांना योग्य मात्रेमध्ये विश्रांती मिळण्यासाठी शांत झोप घेणे अतिशय आवश्यक आहे. जेव्हा आपण गहन निद्रेमध्ये असतो, तेव्हा आपले शरीर त्यामधील घातक द्रव्ये फिल्टर करण्याचे काम करीत असते. म्हणूनच शांत, गाढ झोप लागून आपण जागे होतो, तेव्हा आपले शरीर आपल्याला हलके वाटते, आणि मनही प्रसन्न असते. उत्तम निद्रा ही केवळ शरीरातील अवयवांसाठीच नाही, तर आपल्या त्वचेसाठी देखील अतिशय आवश्यक आहे. जर झोप अपूर्ण झाली असली, तर त्याचे दुष्परिणाम सर्वप्रथम त्वचेवर दिसून येतात. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे येणे. डोळे लालसर दिसू लागणे, किंवा चेहऱ्यावर हलकी सूज दिसून येणे, ही आवश्यक तितकी झोप मिळत नसल्याची लक्षणे आहेत. अपुऱ्या झोपेचे शारीरिक नाही, तर मानसिक दुष्परिणामही होत असतात.

जेव्हा आपल्याला पुरेशी विश्रांती किंवा झोप मिळत नाही, तेव्हा आपला स्वभाव काहीसा चिडचिडा होतो, हे सर्वांनाच जाणविले असेल. जर झोप व्यवस्थित न होणे अनेक दिवस सातत्याने सुरु राहिले, तर ‘ मूड डीसॉर्डर ‘ नामक मानसिक विकार उद्भविण्याची शक्यता असते. जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपला मेंदू आपल्या भावना ‘ प्रोसेस ‘ करीत असतो. ह्याच भावना आपल्या मनामध्ये किंवा मेंदुमध्ये आठवणींच्या रूपात ‘स्टोअर’ केल्या जात असतात. जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही तेव्हा ही प्रक्रिया गडबडते, आणि परिणामस्वरूप व्यक्ती अतिशय लहरी बनते.

झोप अपुरी होत असेल, तर याचा परिणाम स्मरणशक्तीवर देखील होतो. जेव्हा आपण गहन निद्रेमध्ये असतो, तेव्हा आपला मेंदू एक प्रकारे स्वतःला ‘ री-सेट आणि री फ्रेश ‘ करीत असतो. ही प्रक्रिया झोप पूर्ण न झाल्यामुळे व्यवस्थित होत नाही. झोप अपुरी झाल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते. अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढू लागते. रात्री उशीरा झोपणे आणि सकाळी लवकर उठणे, किंवा झोपेचे नियमित वेळापत्रक नसल्याचे परिणाम खाण्यापिण्याच्या वेळांवरही होत असतात. वेळी अवेळी खाण्याने वजन वाढणे, पचनासंबंधी तक्रारी सुरु होतात. जर झोप अपुरी रहात असेल, तर शरीरामध्ये सतत थकवा राहतो व कोणत्याही कामाचा उत्साह राहत नाही. तशातच उच्चरक्तदाब, हृदयरोग, मधुमेह यांसारखे विकार उद्भविण्याचा धोका ही वाढतो. हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी शरीराला आवश्यक तितकी विश्रांती मिळेल याच खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment