पृथ्वीनाथ मंदिरात आहे आशियातील मोठे शिवलिंग


उत्तर प्रदेशच्या गोंडा येथे आशियातील सर्वात मोठे शिवलिंग असलेले पृथ्वीनाथ मंदिर शिवभक्तांच्या श्रद्धेचे स्थान आहे. या मंदिराचा इतिहास महाभारतकालीन आहे असे सांगितले जाते. या मंदिरातील शिवलिंग सुमारे पाच फुट उंचीचे असून त्याला जलाभिषेक करताना पुजारी लोकांना टाचा उंच करून करावा लागतो. पाच पाण्डवातील सर्वात शक्तिशाली भीम याने हे शिवलिंग स्थापले होते असे मानतात.

असे सांगतात कि द्वापार युगात पांडव अज्ञातवासात असताना या भागात राहिले होते. येथे बकासुर नावाचा राक्षस दररोज एक बैल आणि एक माणूस खात असे. गावातील लोक यामुळे त्रासले होते. माता कुंती येथून जात असताना एका मुलीचे रडणे तिच्या कानावर पडले. कारण विचारता कुंतीला समजले कि त्या मुलीच्या घरातील माणूस त्यादिवशीचे बकासुराचे भक्ष्य होता. कुंतीने तिला दिलासा दिला व भीमाला बकासुराचा वध करण्यास सांगिलते. त्यानुसार भीमाने बकासुराला ठार केले. त्यानंतर त्याने या शिवलिंगाची स्थापना केली.

कालांतराने हे शिवलिंग जमिनीत रुतत गेले. पृथ्वीनाथ नावाच्या माणसाने राजा मानसिंग याच्या परवानगीने येथे घर बांधण्यासाठी जमीन खोदली तेव्हा सात खंडात शिवलिंग सापडले. यावर मंदिर बांधले गेले व ते पृथ्वीनाथ मंदिर नावाने ओळखले जाऊ लागले. सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. या मंदिरात केवळ भारतातूनच नाही तर नेपाल मधूनही भाविक येतात. हे शिवलिंग किमान ५ हजार वर्ष जुने असावे असे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे.

Leave a Comment