साणन्द बनतेय भारताचे डेट्रोइट


गुजराथेतील साणन्द भारताचे डेट्रोइट बनण्याच्या दृष्टीने वेगाने वाटचाल करत असल्याचे दिसून आले आहे. बंगालमधून बाहेर पडावे लागलेल्या टाटांच्या नॅनोचे माहेरघर बनलेल्या साणन्द मध्ये सुझुकी, फोर्ड, हिरो मोटोकॉर्प सारख्या अनेक बड्या कंपन्यांनी त्यांचे कारखाने सुरु केले असून लवकरच या शहराची ओळख मोटरसिटी अशी होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.

अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील डेट्रोइट मोटरसिटी म्हणून ओळखले जाते. साणन्द मध्येही अनेक वाहन उत्पादक कंपन्या त्याचे कारखाने सुरु करत आहेत. मारुती सुझुकीचे देश प्रमुख आर.सी भार्गव म्हणाले साणन्द येथे कारखाने सुरु करण्यासाठी पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारच्या आहेतच पण गुजरात सरकार कडूनही उद्योजकांना चांगले सहकार्य मिळते आहे. येत्या काही वर्षात हे प्रमुख आर्थिक केंद्र बनेल असेही ते म्हणाले.

या छोट्या गावात शाळा, शॉपिंग मॉल, वैद्यकीय सुविधा चांगल्या दर्जाच्या आहेत. येत्या पाच वर्षात येथे उद्योगाची संख्या वाढेलच पण सर्व योजनेनुसार पार पडले तर मारुती येत्या १० वर्षात येथे १५ लाख गाड्यांचे उत्पादन करेल असेही भार्गव म्हणाले. फोर्डने येथे १ अब्जाची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे य दीड लाख वाहने ते येथे उत्पादन करणार आहेत. होंडा मोटरसायकल आणि स्कूटरची जगातील सर्वात मोठी फॅक्टरी साणन्द येथेच उभारली गेली आहे.

Leave a Comment