आरबीआयकडून अद्यापही जुन्या नोटांची मोजदाद सुरू


नवी दिल्ली – नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतल्यानंतर चलनातून जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बाद झाल्या. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकामध्ये रांगा लागल्या.

एका वृत्तसंस्थेच्या बातमीदाराने माहितीच्या अधिकारात नोटाबंदीनंतर बँकेत चलनातून बाद झालेल्या किती नोटा जमा झाल्या याची माहिती मागितली होती. आरबीआयने यावर सांगितल्याप्रमाणे ज्या ५०० आणि १००० च्या नोटा बँकेत बदलविण्यासाठी जमा करण्यात आल्या, त्यांची मोजणी आणि सत्यता पडताळण्याची प्रकिया अद्याप सुरू असून ही प्रकिया जलदगतीने करण्यात येत आहे, अशी माहिती आरबीआयने दिली.

आरबीआयने पुढे माहिती देताना सांगितले, की निश्चित बँकाच्या नोटांची मोजणी आणि त्यांची सत्यता पडताळण्याची प्रकिया वेगाने सुरू आहे. ही प्रकिया पूर्ण झाल्यानंतर एकूण नोटांचा हिशोब सादर करता येणार आहे. आरबीआयने चलनातून बाद झालेल्या एकूण किती नोटा बँकेत जमा झाल्या यावर उत्तर देताना सांगितले, की ३० जून २०१७ पर्यंत १५.२८ ट्रिलियन नोटा बँकेत जमा झाल्या. चलनातून बाद झालेल्या नोटांची मोजणी कधीपर्यंत पूर्ण होणार यावर उत्तर देताना आरबीआयचे अधिकारी म्हणाले, की मोजणी अद्याप सुरू असून लवकरच याची माहिती देण्यात येईल, असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave a Comment