पांडवाची राजधानी शोधण्यासाठी आता शेवटचा प्रयत्न


पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थचा शोध घेण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने (एएसआय) कंबर कसली आहे. दिल्लीतील पुराना किला या भागात ही इंद्रप्रस्थ राजधानी होती, असे मानले जात आहे. ही मान्यता खरी आहे का नाही, हे पाहण्यासाठी एएसआय आता शेवटचा प्रयत्न करणार आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंद्रप्रस्थचा शोध घेण्याचा हा चौथा प्रयत्न आहे. सध्याचे खोदकाम सुमारे 13 दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. यावेळेस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे एसआयचे म्हणणे आहे.

हिंदू धार्मिक ग्रंथ व पुराणांमध्ये ज्या ठिकाणी इंद्रप्रस्थ असल्याचे म्हटले जाते ती जागा सध्याच्या दिल्लीतील पुराना किला भागात आहे. मात्र एएसआयकडे याबाबतचे पुरावे नाहीत. त्यामुळे अधिकृतपणे यावर कोणतीही चर्चा केली जात नाही.

या दाव्यातील खरेपणाचा शोध लावण्यासाठी सर्वात प्रथम 1955 साली खोदकाम करण्यात आले होते. त्यानंतर 1969, 1972 आणि 2014 साली खोदकाम करण्यात आले. मात्र या टेकडीला इंद्रप्रस्थ म्हणावे का नाही, यावर अधिकृत निर्णय होऊ शकला नाही. उत्खनन झालेल्या जागा संरक्षित करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला. त्यानंतर 2014 साली उत्खनन झालेल्या जागी पुन्हा उत्खनन करण्याचे ठरविण्यात आले. या उत्खननात मौर्य व शुंग काळातील काही वस्तू मिळाल्या.