आता राज ठाकरेंनाच शिवसेनेत घ्या, शिवसैनिकांची पोस्टरबाजी


मुंबई : घाटकोपरमध्ये शिवसेनेतील नवीन नियुक्तींवरुन शिवसैनिकच आपापसात भिडल्याची घटना ताजी असताना आता पक्षाविरोधी पोस्टरबाजी याच परिसरात शिवसैनिकांनी केली आहे. शिवसैनिकांनी मनसेतून शिवसेनेत आलेल्यांना पद दिल्याने उघडउघड आपली नाराजी व्यक्त केली असून राज ठाकरेंनाच शिवसेनेत घ्या, असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.

घाटकोपरमध्ये शिवसेनेतील नवीन नियुक्त्यांवरुन शिवसैनिकच आपापसात भिडल्याची घटना घडली. दोन गटातील शिवसैनिकांचा शाखाप्रमुख पदावरुन राडा झाला. घाटकोपर पश्चिममधील शाखा क्रमांक १२९ च्या बाहेर शिवसैनिकांचा राडा झाला. गेल्या सहा वर्षांपासून या शाखेच्या विभागात प्रदीप मांडवकर हे विभागाचे शाखाप्रमुख होते. मात्र नव्या नियुक्त्यांनंतर शिवाजी कदम यांची या पदावर निवड झाली.

वर्षभरापूर्वीच शिवाजी कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाय त्यांचे वयही जास्त असल्यामुळे कदम यांना शाखाप्रमुख पद दिल्याने स्थानिक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच नाराजीतून मांडवकर आणि कदम यांचे समर्थक आपापसात भिडले.