भूकेविषयी थोडेसे…


अनेकदा पोटभर जेवल्यानंतर देखील भूक लागल्याची भावना होत असते. असे का होते? आपल्या मनावरील तणावामुळे अनेकदा वारंवार भूक लागते. भुकेवर नियंत्रण ठेवता येते का? आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी पुन्हा एकदा रुळावर आणणे शक्य आहे का, या आणि अश्या अनेक तऱ्हेच्या शंका वारंवार आपल्या मनामध्ये येत असतात. याच काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू या.

अनेकदा पोटभर जेवण झाल्यानंतर देखील काही वेळातच परत भूक लागते. तज्ञांच्या मते ही ‘ नकली भूक ‘ आहे. मग नकली भूक आणि खरोखरची भूक यामध्ये काय फरक आहे, तर जेव्हा आपल्या शरीराला खरोखर अन्नाद्वारे मिळणाऱ्या उर्जेची गरज असते, तेव्हा आपल्याला भूकेची भावना होत असते. नकली भूक म्हणजे पोट भरलेले असताना, आपल्याला अन्नाची गरज नाही हे कळत असताना देखील काही तरी खाण्याची अनावर इच्छा होणे. तज्ञांच्या मते या नकली भुकेमागे देखील वैज्ञानिक कारणे आहेत. यामागचे मुख्य कारण असे, की अनेकदा तहानेच्या भावनेला आपण भूक लागली असे समजून अन्नाचे सेवन करतो. त्यामुळे पोटभर जेवल्यानंतर देखील भुकेची भावना झाल्यास पाणी प्यावे, किंवा ताज्या फळांचा रस घ्यावा. दुसरे कारण म्हणजे जर शरीराला पुरेशी विश्रांती मिळाली नसेल, तर त्या शारीरिक थकव्याला भुकेची भावना समजण्याची शक्यता असते. त्यामुळे अश्या वेळी पंधरा वीस मिनिटे डुलकी काढल्याने भुकेची भावना नाहीशी होते.

आपल्याला खरोखरच भूक लागली आहे किंवा नाही हे समजून घेण्यासाठी आपले शरीर आपल्याला देत असलेले ‘ हंगर सिग्नल्स ‘ समजून घेण्याची आवश्यकता आहे. जर थकवा, अशक्तपणा जाणवू लागला, पोटामध्ये भूक लागल्याची जाणीव होऊ लागली, खूप वेळपर्यंत अन्नसेवन न केल्याने जर हलकी डोकेदुखी उद्भवली, किंवा चित्त इक्ग्र करणे काठी होऊ लागले, तर आपल्याला अन्नाची गरज आहे हे ओळखावे. पोट भरलेले असून देखील एखादा पदार्थ दिसल्यानंतर तो खाण्याची इच्छा होणे, किंवा इतरांना खाताना पाहून आपल्याला देखील काहीतरी खाण्याची इच्छा होणे, ही नकली भुकेची लक्षणे आहेत.

आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा आवर्जून पाळायला हव्यात. दर दोन तीन तासांनी हलका आहार घेतला जावा असे आहारतज्ञांचे मत आहे. त्याचबरोबर सकाळचा नाश्ता हे दिवसभरातील सर्वात महत्वाचे भिजण आहे, त्यामुळे सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नये. तसेच एकदम कडकडून भूक लागण्याची वाट न बघता, दर दोन तीन तासांनी पौष्टिक आहार घेत राहावे. यामुळे जंक फूड खाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे सोपे होईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment