पॉलिसी खरेदी केल्यानंतर ९० दिवसांच्या आत मृत्यू झाला तरी मिळणार विम्याचे पैसे


नवी दिल्ली – एखाद्या पॉलिसीधारकाने पॉलिसी खरेदी केल्यानंतर त्याचे ९० दिवसांच्या आत आकस्मिक निधन झाले तरी विमा कंपनी निश्चित केलेली रक्कम देण्यास नकार देऊ शकत नाही. एका प्रकरणात विमा कंपनीला मृत पॉलिसीधारकाच्या परिवारला ९ टक्के व्याजाबरोबर २.५ लाख रूपयांची रक्कम देण्याचा आदेश राष्ट्रीय ग्राहक पुनर्वसन आयोगाने (एनसीडीआरसी) दिला आहे. पॉलिसीधारकाचा मृत्यू याप्रकरणात पॉलिसी खरेदी केल्यानंतर ९० व्या दिवशीच झाला होता.

या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार पंजाबमधील फाजिल्का येथील हे प्रकरण असून पॉलिसीधारकाचे नाव कुलविंदर सिंग असे आहे. २६ मार्च २०१० मध्ये त्यांनी एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शूरन्स कंपनीची एक विमा पॉलिसी खरेदी केली होती. त्यांनी ४५,९९९ रूपयांचा प्रिमियम यासाठी भरला होता.

त्याचे त्याचवर्षी २५ ऑगस्ट रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर विमा कंपनीकडे त्यांच्या कुटुंबीयांनी दावा दाखल केला होता. पण त्यांना प्रिमियमची रक्कम देऊन कंपनीने त्यांची बोळवण केली होती. २७ जून २०१२ रोजी विमा नियामक आयआरडीएचा हवाला देत न्या. एस श्रीशा यांनी विमा कंपनीला संपूर्ण रक्कम देण्यास सांगितले. आयआरडीएचा हा आदेश पण याच विमा कंपनीसाठी होता.