परीक्षेदरम्यान मानसिक तणाव कमी करणारी हेल्थ ड्रिंक्स


आता लवकरच मुलांच्या परीक्षा सुरु होत आहेत. त्या दृष्टीने मुले आणि पालक आपापल्या परीने तयारी करण्यात गुंतले आहेत. मुले अभ्यासामध्ये मग्न आहेत, तर पालक मुलांची एकाग्रता वाढावी, त्यांच्या मनावर कोणत्याही प्रकारचा तणाव असू नये, त्यांना पुरेशी विश्रांती आणि भरपूर शारीरिक पोषण मिळावे यासाठी झटत आहेत. आजकाल, मुलांची शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढावी या करिता निरनिराळ्या ब्रँडची हेल्थ ड्रिंक्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण बाजारातून आणलेल्या ह्या पदार्थांचा कितपत उपयोग मुलांच्या विकासासाठी होईल याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. अश्या वेळी या जाहिरातींच्या आहारी न जाता मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक असलेली हेल्थ ड्रिंक्स घरच्या घरी देखील बनविली जाऊ शकतात.

स्मरणशक्ती आणि विचारशक्ती वाढावी यासाठी बदामांचा उपयोग आपल्याकडे पूर्वापार चालत आला आहे. बदामामध्ये असलेली प्रथिने मेंदूच्या विकासासाठी आवश्यक आहेत. बदामांना अधिक गुणकारी बनविण्यासाठी बदाम आणि दुध यांचे मिश्रण मुलांना द्यावे. स्ट्रॉबेरीज आणि ब्लू बेरीज ही दोन्ही फळे ब्रेन सेल्सची हानी रोखण्यास सक्षम आहेत. या दोन्ही फळांमध्ये असलेले क जीवनसत्व स्मरणशक्ती वाढविण्यास सहायक आहे. तसेच या फळांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. जर मुलांना या फळांचा मिल्क शेक आवडत असेल, तर त्यांना ही फळे मिल्क शेक मधून द्यावीत.

डार्क चॉकोलेट एकाग्रता वाढविण्यासाठी सहायक आहे. यामध्ये असलेले कॅफिन मुलांना सजग आणि सक्रीय राहण्यास मदत करेल. याच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहील. डार्क चॉकोलेट दुधामध्ये मिसळून चॉकोलेट मिल्क शेक मुलांना देता येईल. बीटाचा रस हे अतिशय स्वादिष्ट आणि पोषक पेय आहे. बीटमध्ये असलेले अ, के, क आणि बीटा कॅरोटीन ही जीवनसत्वे, यामध्ये असणारी अँटी ऑक्सिडँट्स, आणि पॉलिफेनॉल्स मुलांच्या मनाला ताजेतवाने व तणावरहित ठेवण्यास सहायक आहे. या पेयामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील चांगली राहण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment