श्रीलंकेच्या त्रिन्कोमाली मधील कोनेश्वर महादेव मंदिर


देशात महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. भारताबाहेर अन्य देशातही शिवमंदिरे पाहायला मिळतात. त्यातील एक प्राचीन मंदिर श्रीलंकेच्या त्रिन्कोमाली येथे असून त्याला कोनेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. हे प्राचीन हिंदू मंदिर समुद्राकाठी असलेल्या उंच पहाडावर असून येथून दिसणारे निसर्गसौंदर्य तसेच खाडीचे दृश्य मनाला आनंद तसेच शांती देते.

पुराणात ज्या पंच ईश्वरम मंदिराचा उल्लेख येतो त्यातील हे एक मंदिर मानले जाते. किनारपट्टी भागातील हे मंदिर ख्रिस्तपूर्व ४०० वर्षे जुने असल्याचा दावा केला जातो. या मंदिराचा त्यानंतर दोन वेळा जीर्णोद्धार केला गेला आहे. एकदा ५ व्या शतकात व नंतर १७ व्या शतकात या मंदिराची पुनर्बांधणी केली गेली. पोर्तुगीज वसाहत काळात या मंदिराची तोडफोड करून ते अवशेष समुद्रात टाकले गेले होते. विल्सन नावाच्या फोटोग्राफरला समुद्रातील हे अवशेष दिसले तेव्हा ते बाहेर काढले गेले व मंदिरात स्थापले गेले. त्यात शंकरचे स्वयंभू लिंग, शेकडो कलाकुसरीचे खांब होते. विल्सन याने इतका भारावला की त्याने कुटुंबासह हिंदू धर्माचा स्वीकार केला.

असे सांगतात रावण हा मोठा शिवभक्त होता. त्याची आई आजारी पडली तेव्हा रावणाने कोनेश्वर महादेवाला घरी नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या हातातील तलवार खडकावर पडली तेथे मोठी घळ तयार झाली ती आजही पाहता येते. येथे रावणाचा पुतळा आहे. मंदिरासमोर प्रचंड मोठी शिवमूर्ती आहे तसेच गाभाऱ्यात मोठे स्वयंभू शिवलिंग आहे. मूळ मंदिर दाक्षिण्यात्य शैलीचे, गोपुरे असलेले होते. समुद्रातून येणाऱ्या खलाश्यांना हे गोपूर दुरूनही दिसत असे. समुद्रातून सापडलेल्या अवषेशातून हे मंदिर १९६३ साली पुन्हा बांधले गेले. केवळ हिंदू नाही तर सर्व धर्माचे लोक येथे दर्शनाला येतात. मंदिर परिसरात एक झाड आहे. अपत्यहीन जोडपी येथे मूल व्हावे म्हणून झाडाला छोटे पाळणे टांगून नवस बोलतात.

Leave a Comment