अशी असावी घरातील बेडरूम…


घरामधील आपली झोपण्याची खोली, म्हणजेच बेडरूम याचा वापर केवळ झोपण्यासाठी किंवा कपडे ठेवण्याच्या कपाटे बनविण्यासाठी केला जात नाही. ही खोली तुम्हाला आराम, आणि मन:शांती मिळविण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे या खोलीतील वातावरण तणाव रहित, प्रसन्न असायला हवे. जर बेडरूम मधील वातावरण आल्हाददायक असेल, तरच तिथे तुम्हाला शांत झोप लागेल, तुमच्या शरीरावरील आणि मनावरील सर्व प्रकारचे ताण तणाव दूर होतील, आणि तुमचे मन प्रसन्न राहील. त्या दृष्टीने आपली झोपण्याची खोली सजविताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी सौम्य रंगांचा वापर करावा. सौम्य, न्युट्रल रंगांमुळे बेडरूम प्रशस्त दिसते. हलका निळा, हिरवा, लॅव्हेंडर रंग किंवा ऑफ व्हाइट रंग तुमच्या मनाला प्रसन्न करतील. तुमच्या बेडरूम करिता तुम्ही मोनोक्रोम रंग देखील वापरून पाहू शकता. ऑफ व्हाइट, आणि हलका ग्रे ही रंगसंगती बेडरूम करिता चांगला पर्याय ठरू शकते. तसेच आपण झोपणार असलेली मॅट्रेस, म्हणजेच गादी आरामदायक असयला हवी. आजकाल अनेक व्यक्तींना पाठीची, कंबरेची दुखणी असतात. त्या दुखण्यातून आराम मिळण्याच्या दृष्टीने अनेक तऱ्हेच्या मॅट्रेसेस बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आपण झोपणार असलेली गादी फार नरम असून नये, तशी ती फार कठिण देखील असू नये. मॅट्रेसच्या क्वालिटी मध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये.

तुमची बेडरूम ही तुमची खासगी स्पेस आहे. त्यामुळे तुम्हाला आवडत असलेल्या रंगाच्या वस्तू आपल्या बेडरूम मध्ये ठेवा. तुम्हाला आवडत असलेल्या रंगांचा उपयोग तुम्ही तुमच्या बेडरूमचे पडदे, कुशन्स यांसाठी करा. तुमचा पलंग हा तुमच्या बेडरूमला हायलाईट करीत असतो, त्यामुळे त्यावरील बेडशीट्स आणि कुशन्सची रंगसंगती विचारपूर्वक करा. जर तुमच्या बेडरूमचा आकार लहान असेल, तर आपल्या बेड साठी मोठ्या प्रिंटची बेडशीट निवडू नका. तुमच्या बेडरूममध्ये मुख्यतः तुमचा बेड आणि कपड्यांचे कपाट असते. त्याव्यतिरिक्त तुमच्या बेडरूम मध्ये जास्तीची जागा सेल, तरच त्यामध्ये इतर फर्निचर ठेवण्याचा विचार करा.

तुमची बेडरूम आरामदायक असायला हवी. त्यामुळे त्या खोलीमध्ये सामानाची अडगळ करू नका. तसेच या खोलीमध्ये ताजी हवा खेळती असावी आणि नैसर्गिक उजेडही यायला हवा. तसेच रात्रीच्या वेळी खोलीतील उजेड फार प्रखर नसावा. रात्रीच्या वेळी बाहेरील उजेड खोलीमध्ये येणार नाही आणि त्यामुळे झोपोमोड होणार नाही अश्या बेताने पडदे ठेवावेत.

Leave a Comment