पॅडमॅन म्हणजे अतिशय संवेदनशील विषयाची उत्तम हाताळणी


चीनी कम, पा, की अँड का आणि शमिताभ सारखे दर्जेदार चित्रपट साकारणाऱ्या आर बाल्की यांचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. आर. बाल्की यांनी या चित्रपटातून महिलांशी निगडीत अतिशय संवेदनशील मुद्दा मोठ्या कलात्मकतेने आणि तितक्याच प्रत्ययकारीपणे मांडण्याचा सुरेख प्रयत्न केला आहे. हा चित्रपट एक स्ट्राँग मेसेज देणारा असून चित्रपटात अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या तामिळनाडूच्या अरुणाचलम मुरुगनाथन यांच्या आयुष्यावर असून चित्रपटात मासिक पाळीच्या वेळी महिलांना वापरता येतील असे स्वस्त सॅनिटरी नॅपकिन बनवणा-या या अवलियाच्या संघर्षाची कहाणी रेखाटण्यात आली आहे.

मध्य प्रदेशाच्या एका छोट्या गावात वास्तव्याला असलेल्या लक्ष्मीकांत चौहान उर्फ लक्ष्मी (अक्षय कुमार) याची ही कहाणी आहे. पत्नी गायत्री (राधिका आपटे) वर लक्ष्मीचे जीवापाड प्रेम असते. त्याचे तिच्या प्रत्येक लहान-सहान गोष्टींकडे लक्ष असते. गायत्रीचे आयुष्य त्याला सुखदायक करायचे असते.

गायत्री एका साध्या फॅक्ट्री वर्करची पत्नी असल्याने महागडे सॅनिटरी नॅमकिन खरेदी करु शकत नाही. ती मासिक पाळीच्या काळात घाणेरड्या कपड्यांचा वापर करते, लक्ष्मीला हे जेव्हा समजते, तेव्हा तो स्वतः सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचा निर्णय घेतो. परवडत नाही म्हणून मासिक पाळीमध्ये वापरले जाणारे सॅनिटरी पॅड अनेक महिला वापरत नाहीत. त्यामुळे लक्ष्मी स्वस्तातील पॅड तयार करण्यासाठी जंग जंग पछाडतो. पण त्याच्यावर टीका केली जाते. त्याची खिल्ली उडवली जाते. त्याला लोक विकृत म्हणू लागतात. पण लक्ष्मी माघार घेत नाही आणि संघर्षाला सामोरे जातो. त्याला पत्नी, बहिण, आई आणि समाजाचा या प्रवासात विरोध होतो. किंबहुना गावकरीसुद्धा त्याला बहिष्कृत करतात. पण, वाटेत येणारा प्रत्येक अडथळा त्याला आणखीनच धीर देऊन जातो. त्याला त्याच्या अखेर प्रयत्नात यश मिळते, का हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

अभिनेता अक्षय कुमारने लक्ष्मीच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. अरुणाचलम मुरुगनाथन यांचे इंग्रजीतील भाषण ज्यांनी ऐकले आणि बघितले आहे, चित्रपटात अक्षयने त्यांची बॉडी लँग्वेज आणि बारकावे किती उत्तमरित्या टिपलेत हे त्यांना लगेच लक्षात येईल. आपल्या वाट्याला आलेली भूमिका राधिका आपटेने उत्तम वठवली आहे. अक्षय कुमारसोबतची तिची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. सोनम कपूरने म्युझिशिअन परीच्या भूमिकेत दमदार अभिनय केला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बाल्की यांनी उत्तम केले आहे. चित्रपट सॅनिटरी नॅपकीनविषयीचे काही मुद्दे पटवून देताना उगाचच लांबत आहे असे वाटू लागते. पण, चित्रपटातील खुमासदार संवाद, अक्षयचा उत्तम अभिनय आणि एकंदरच सहकलाकारांची बसलेली घडी या सर्व गोष्टींमुळे लांबणारा चित्रपट कंटाळवाणा वाटत नाही. चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा कॅमिओ आहे. त्यांची स्पीच खूप लांबलचक आहे. ती कमी करता येऊ शकली असती.

अमित त्रिवेदीने चित्रपटाला संगीत दिले आहे. कौसर मुनीर यांनी लिहिलेले ‘आज से तेरी’ हे गाणे रिलीजपूर्वीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. हे गाणे अरिजीत सिंहने स्वरबद्ध केले आहे. इतर गाणीही चांगली झाली आहेत. एकंदरच अतिशय संवेदनशील विषयाची उत्तम हाताळणी करण्यात आलेला हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की बघायला हवा.