औषधी गुणांनी युक्त पुदिना


पुदिन्याच्या पानांचा वापर प्रामुख्याने स्वयंपाकघरामध्ये होतो. चविष्ट चटणी, सरबते, यांमध्ये पुदिन्याच्या पानांचा वापर केला जातो. पण चटणीचा किंवा सरबताचा स्वाद वाढविण्याशिवाय पुदिन्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुण आहेत, ज्यांच्या उपयोग आपल्या आरोग्याकरिता होऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा शरीरामध्ये उष्णता झाल्यास पुदिन्याच्या पानांच्या वापराने गुण येऊ शकतो. यासाठी पुदिन्याची काही ताजी पाने थोडे पाणी घालून वाटून घ्यावीत. त्यामध्ये भाजेलेल्या जीऱ्याची पूड, लिंबाचा रस, आणि चवीपुरते मीठ घालून याचे सेवन करावे. ह्या पेयाचे नियमित सेवन केल्यास शरीरातील उष्णता व त्यामुळे उद्भविणारे विकार दूर होतात. तसेच पोटदुखी, पचनासंबंधीच्या तक्रारी दूर होण्यास ही मदत होते.

जर सतत उचकी लागत असेल, आणि वारंवार पाणी पिऊनही उचकी थांबत नसेल, तर दहा ते बारा पुदिन्याची ताजी पाने चावून खावीत. या उपायाने उचकी थांबण्यास मदत होईल. पुदिन्याची पाने पचनक्रियेसाठी अतिशय गुणकारी आहेत. ह्या पानांचे सेवन केल्याने पित्त, आंबट ढेकर येत असल्यास त्वरित गुण येतो. तसेच जर पचनक्रिया सुरळीत नसेल, तर काही वेळा तोंडाला दुर्गंधी येण्याची शक्यता असते. पुदिन्याच्या पानांच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत होईलच, शिवाय तोंडाची दुर्गंधी देखील नाहीशी होईल.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरील उष्ण हवामानामुळे तब्येत बिघडण्याचा धोका संभवतो. त्यामुळे घरातून भर पडण्यापूर्वी पुदिन्याच्या पानाचा रस पाण्यात मिसळून हे पाणी प्यावे. तसेच अपचनामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे उलट्या होत असतील तर अर्धा कप पाण्यामध्ये पुदिन्याच्या पानांचा रस मिसळून प्यावे. याने आराम मिळेल. तसेच पोटदुखी उद्भविल्यास पुदिन्याची ताजे पाने कुटावीत, त्यामध्ये थोडे जिरे आणि काळी मिरी आणि चिमुटभर हिंग घालावा. हे मिश्रण खाल्ल्याने पोटदुखी मध्ये आराम मिळेल. चेहऱ्यावर उष्णतेमुळे पुरळ येत असेल, तर पुदिन्याची पाने वाटून हा लेप चेहऱ्यावर लावल्याने आराम मिळेल.