उत्तम आणि सहज अभिनयाचा नमूना ‘आपला मानूस’


अभिनेता नाना पाटेकर पुन्हा एकदा अजय देवगणची निर्मिती असलेला आपला मानूस या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या तडफदार भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले असून विवेक बेळे यांच्या‘काटकोन त्रिकोण’या नाटकावर बेतलेला हा चित्रपट अतिशय उत्कंठावर्धक असून चित्रपटाचे कथानक एका वृद्ध व्यक्तीची आत्महत्या की खून याच्या आसपास फिरते.

शहरी जीवन राहुल (सुमीत राघवन ) आणि भक्ती (ईरावती हर्षे) हे दाम्पत्य जगत असतात. दोघेही नोकरी करत असल्याने ते घराकडे फारसे लक्ष देऊ शकत नाही. राहुल हा वकील आहे तर भक्ती कॉलेजमध्ये शिक्षिका असते. या दोघांना घरात देता येणारा कमी वेळ आणि त्यांच्या घरात असणारे राहुलचे वृद्ध वडील यांच्यात शीतयुद्ध सुरु होते आणि जनरेशन गॅपचा वाद रंगतो.

एका अपघातात राहुलच्या वडिलांचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यूची मिस्ट्री सोडवण्यासाठी सिनीअर इन्सपेक्टर मारुती नागरगोजे यांच्या रुपात नाना पाटेकर येतात. नेहमीप्रमाणेच यावेळीही नाना फार तडफदार भूमिकेत दिसले आहेत. नाना यांच्यासोबतच सुमीत राघवन आणि इरावती हर्षे यांनीही राहुल-भक्ती उत्तमरित्या साकारले आहेत. या चित्रपटाला सतीश राजवाडे यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकांचे दिग्दर्शन लाभले आहे आणि नाना यांच्यातील एक तडफदार पोलीस ऑफिसर बरोबर बाहेर काढला आहे.

आपल्याला उत्तम पण त्यासोबतच सहज अभिनय असा चित्रपटात असावा हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहावा. हा चित्रपट गुन्हा आणि नाते यांचे अनेक पैलु उलगडून दाखवणारा असून चित्रपटात मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्सचाही वापर करण्यात आला आहे. या थरारपटाच्या रुपाने आपल्याला एक गोष्ट तीन पद्धतीने कशी फिरवून सांगता येते हे पाहता येणार आहे. नानांचे उत्तम संवादफेक आपल्याला चित्रपट पाहण्याची मजा आणखीनच वाढवते.

चित्रपटात एकही गाणे नाही पण बॅकग्राउंड म्युझिकही श्रवणीय आहे. हा एक थरारपट असल्याने केवळ आपण एका व्यक्तीच्या मृत्यूचे रहस्य उलगडले आणि चित्रपट संपला असे होत नाही तर कौटुंबिक नाते-गोते यांविषयीही आपणास हा चित्रपटा खूप काही सांगून जातो. केवळ चित्रपट नव्हे तर आपल्या कुटुंबातील नात्यांचा साक्षात्कार आपल्याला झाल्याचा अनुभव आपण चित्रपट पाहिल्यावर नक्कीच घ्याल.