कपड्यांवरील डाग हटविण्याकरिता काही टिप्स


तुमच्या आवडत्या ड्रेसवर कोणत्याही प्रकारचा डाग पडला असल्यास, आणि वारंवार धुवून देखील डाग निघत नसल्यास काय कराल? तुमच्या आवडत्या लेदर बॅगवर तेलकट डाग पडल्यास, किंवा शर्टवर सतत सुरकुत्या पडत असतील तर त्या कशा घालवाल? या बद्दल काही सोप्या टिप्स, खास माझा पेपरच्या वाचकांसाठी.

अनेक वेळा शर्ट इस्त्री करून देखील शर्टची कॉलर चुरगळल्यासारखी दिसते. कॉलर जर जाड असली, तर कितीही इस्त्री फिरविली, तरी त्यावरील चुण्या काही हटत नाहीत. अश्या वेळी कॉलर इस्त्री करण्यासाठी, तुमच्याकडे जर हेअर स्ट्रेटनर उपलब्ध असेल, तर त्याचा वापर करावा. ज्या प्रकारचे शर्टचे कापड आहे, त्याप्रमाणे स्ट्रेटनरचे तापमान नियंत्रित ठेवावे. याने इस्त्री केल्याने कॉलर्स व्यवस्थित इस्त्री होतील.

अनेकदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कपड्यांवर घामाचे पिवळसर डाग दिसून येतात. हलक्या रंगांच्या कपड्यांवर हे डाग आणखीनच उठून दिसतात. लिंबाच्या रसाच्या वापराने हे डाग घालविता येऊ शकतात. यासाठी एका स्प्रे बॉटल मध्ये लिंबाचा रस घाला आणि हा रस पिवळ्या डागांवर स्प्रे करा. हा रस कपड्यांवर दहा मिनिटे राहू द्या आणि मग नेहमीप्रमाणे कपडे धुवून टाका.

अनेकदा आपल्या चामड्याच्या ब्रीफकेसवर किंवा बॅगवर तेलकट डाग पडतात. आपल्या हातांना सतत घाम येत असल्यासही अश्या प्रकारचे डाग आपल्या बॅगवर पडू शकतात. हे डाग घालविण्यासाठी बेबी पावडर चा वापर करा. डागांवर बेबी पावडर भुरभुरून, ती रात्रभर डागांवर राहू द्यावी. सकाळपर्यंत ही पावडर बॅगवरील तेलकटपणा शोषून घेते, व डाग नाहीसे होतात.

तुम्ही नुकतेच नवीन आणलेले शूज अचानक थोडे घट्ट होऊ लागले, तर ते घातल्याने पायांवर घासले जाऊन पावलांना जखमा होण्याही शक्यता असते. अश्या वेळी शूजच्या आतमध्ये थोडे जाडसर मोजे घाला. त्यानंतर पावलांवर वीस ते तीस सेकंद हेअर ड्रायरमधील गरम हवेचा ‘ ब्लो ‘ करा. असे केल्याने तुमचे शूज त्वरित थोडे सैल होतील. तसेच तुमच्या पर्स किंवा जॅकेटची झिप अडकत असल्यास त्यावर थोडे मेण फिरवा, झिप सहजरीत्या उघडू-बंद होऊ लागेल.

Leave a Comment