तिसर्या जगातल्या देशात लोकसंख्येचा भस्मासूर अस्वस्थ करीत आहे. दक्षिण आशिया आणि आफ्रिका खंडातल्या काही देशांत लोकसंख्या भरमसाठ वाढत असतानाच जपान, अमेरिका, जर्मनी, नॉर्वे, स्विडन या देशात लोकसंख्या वाढत का नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसर्या महायुद्धानंतर जगातले अर्थतज्ञ लोकसंख्या या विषयाचा जरा जादाच विचार करायला लागले तसे त्यांना प्रगत देशांतल्या लोकांची प्रजननक्षमता घटत चालल्यामुळे या देशांना आज ना उद्या लोकसंख्येची समस्या भेडसावणार आहे असे लक्षात आले. औद्योगीकरण आणि लोकसंख्या घटणे यांचा काही तरी संबंध आहे असे त्यांना जाणवायला लागले. त्यामुळे ते अशा निष्कर्षाप्रत आले की देशाची प्रगती होत जाते तसे जननाचे प्रमाण आपोआप कमी होते.
प्रदूषण आणि प्रजनन
शास्त्रज्ञांनी ही गोष्ट मान्य केली होती. पण जनन प्रमाण घटण्यास बदलती जीवनशैली जबाबदार असल्याच्या निष्कर्षाप्रत ते आले होते. जीवनशैलीतला बदल लोकांना लठ्ठ बनवतो आणि त्यापोटी त्यांच्या शुक्राणूंचा दर्जा घसरून त्यांना मुले होईनाशी होतात. बैठी कामे, व्यसने, तणाव आणि दगदग हीही कारणे जनन प्रमाण कमी होण्यामागे आहेत असे त्यांचे मत होते. मात्र बदलत्या जीवनशैलीतला प्रदूषण हाही घटक यास जबाबदार असल्याचे आता लक्षात यायला लागले आहे. पूर्वीच्या निष्कर्षात प्रगतीचा परिणाम पुरुषांच्या जननक्षमतेवर झालेला दिसत होता. पण प्रदूषणाचा परिणाम मुलींच्या मासिक पाळीवर होतो असे दिसून आले आहे. हा परिणाम दीर्घकाळ तसाच राहिला की त्याचे पर्यवसान जनन क्षमतेतील दोषांत होते.
अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठातल्या तज्ज्ञांनी प्रदूषणाचे आरोग्यावर काय काय परिणाम होतात याचा बारकाईने अभ्यास केला असता असे दिसून आले की, प्रदूषित हवेतले काही लहान कण श्वासावाटे शरीरात गेले की, पौगंंडावस्थेतल्या मुलींच्या मासिक पाळीत अनियमितता येते. श्रुती महालिंगय्या यांनी या संबंधात काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यानुसार या घटकांचा परिणाम एकदा झाला की त्या मुलीची मासिक पाळी पुन्हा नियमित व्हायला बराच काळ लागतो. काही मुलींच्या मासिक पाळीच्या अनियमिततेच्या तक्रारी होत्या. त्यांचा वेगळा अभ्यास केला असताही या दोषास प्रदूषण आणि प्रदूषित हवेतले काही घटक जबाबदार असल्याचे आढळले. तेव्हा शाळा आणि महाविद्यालयात जाणार्या मुलींना आता मास्क लावून घराबाहेर पडण्याचा सल्ला द्यावा लागत आहे.