शेअर बाजार गडगडल्याने झुकरबर्गला ३.६ अब्ज डॉलर्सचा फटका


वॉशिंग्टन : काल (मंगळवार) अमेरिकेच्या शेअर बाजारात झालेल्या अभूतपूर्व पडझडीचा फटका जगातील दिग्गज उद्योजकांनाही बसला आहे. फेसबुकचा सीइओ मार्क झुकरबर्ग याला दिवसभरात ३.६ अब्ज डॉलर्सचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. ३.६ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २३० अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. फेसबुकचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरल्याचा फटका मार्क झुकरबर्गला बसला आहे. तर एका दिवसात वॉरेन बफे यांना ५.३ अरब डॉलर अर्थात सुमारे ३४० अब्ज रुपयांचे नुकसान झाले. फोर्ब्सच्या रिअल टाइम रॅकिंगमधील वॉरेन बफे हे तिसरे श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जातात. त्यांनाही अमेरिकेतील शेअर बाजारात झालेल्या उलथापालथीचा मोठा फटका बसला.

दुसरीकडे, काल भारतीय बाजारपेठेतही मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्स काल दिवसाच्या सुरुवातीलाच तब्बल १२०० अंकांनी घसरला होता. पण दिवस अखेर ही घसरण जरा सावरली. काल सकाळी १२०० अंकांनी झालेली घसरण दिवसअखेर ५६१ अंकांवर, तर निफ्टीची घसरण १६८ अंकांवर थांबली.

भारतीय शेअर बाजारावर अमेरिकन बाजारपेठेत झालेल्या पडझडीचा परिणाम दिसून आला. फेडरल बँकेने अमेरिकेची अवस्था नाजूक असताना व्याजदर शून्य टक्क्यांवर आणले होते. पण आता अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागल्यामुळे व्याजदर १ टक्का करण्यात आले, पण ते आणखी दोन टक्क्यांनी वाढून ३ टक्क्यांपर्यंत व्याजदर जाऊ शकतात, असे फेडरल बँकेने सूचित केल्यामुळे काल, अमेरिकन बाजाराने आपटी खाल्ली. परिणामी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसा काढून घेतला.

Leave a Comment