गर्भावस्थेमध्ये या ही वस्तूंचे डोहाळे..!


गर्भावस्थेमध्ये महिलांच्या शरीरामध्ये अनेक तऱ्हेचे हार्मोन्स क्रियाशील असतात. यातील काही हार्मोन्स जास्त सक्रीय असल्याने वेळी अवेळी एखादी ठराविक गोष्ट खाण्याची, गर्भवती महिलांना अनिवार इच्छा होत असते. यालाच ‘ क्रेव्हिंग ‘ किंवा देखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे डोहाळे लागणे असे म्हणतात. एरव्ही खाण्यास आवडत नसलेले पदार्थ देखील या वेळी खावेसे वाटू लागतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, की ही ‘क्रेव्हीन्ग्स’ केवळ खाद्यपदार्थांशी निगडीत नसतात. ही क्रेव्हीन्ग्स इतर वस्तूंसाठी देखील असू शकतात. याला वैद्यकीय भाषेमध्ये ‘पिका’ असे म्हणतात. गर्भावस्थेमध्ये अनेक विचित्र वस्तूंचे डोहाळे महिलांना लागू शकतात.

काही गर्भवती महिलांना कोळसा खाण्याचे डोहाळे लागतात. सुमारे २५ ते ३० टक्के गर्भवती महिलांमध्ये कोळसा खाण्याची इच्छा उत्पन्न होताना पहावयास मिळते. वैद्यकीय इमर्जन्सी मध्ये कोळशाचा वापर रुग्णाच्या शरीरातील घातक पदार्थ शोषण्यासाठी केला जातो, हे जरी खरे असले, तर गर्भवती महिलांनी कोळसा खाणे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कोळसा खात राहिल्याने गर्भवती महिलेच्या शरीरातील पोषक तत्वे कोळश्यामध्ये शोषली जातात. ह्याचे नुकसान महिला, आणि तिच्या पोटामध्ये वाढणारा जीव या दोघांनाही होऊ शकते.

प्रसिद्ध पॉप स्टार ब्रिटनी स्पियर्स हिने ती गर्भवती असताना, तिला चिकन सूप सोबत माती खाण्याची अनिवार इच्छा होत असल्याची कबुली दिली आहे. नुकत्याच केल्या गेलेल्या रिसर्चमध्ये माती खावीशी वाटणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. गर्भावस्थेमध्ये जर महिलेच्या शरीरामध्ये कॉपर आणि लोहाची मात्रा कमी असेल, तर माती खाण्याची इच्छा त्यांच्यामध्ये उत्पन्न होऊ शकते. पण मातीसोबत मातीतील घातक जीवाणू खाल्ले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे माती खाण्याची इच्छा वारंवार होत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

अनेक गर्भवती महिलांना कच्च्या कांद्याचा वास देखील सहन होत नाही, तर अनेक गर्भवती महिलांना कच्चा कांदा खावासा वाटतो. कच्चा कांदा खाण्यामध्ये कोणतेही नुकसान नसले, तरी तो प्रमाणातच खाल्ला जावा. अनेक गर्भवती महिलांना बर्फ खाण्याची इच्छा होते. खरेतर बर्फाला काही चव नसते, तरी ही बर्फ खाण्याची अनिवार इच्छा या महिलांना होत असते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार एखाद्या वस्तूचे क्रेव्हिंग त्यांच्या चवीवर नाही, तर त्या वस्तूच्या टेक्श्चर वर अवलंबून असते, म्हणजे ती वस्तू स्पर्शाला कशी आहे या वर त्या वस्तूचे क्रेव्हिंग अबलंबून असते.

काही गर्भवती महिलांना तर चक्क भिंतीवरला पेंट खावासा वाटतो. पण पेंट मध्ये अनेक तऱ्हेची घातक रसायने असतात, जी महिलेकरिता आणि तिच्या बाळाकरिता हानिकारक असू शकतात. त्यामुळे पेंट खाण्याची इच्छा नक्कीच धोकादायक ठरू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment