‘म्हाडा’च्या अब्जाधीश निलंबित उपायुक्ताला यूएईतून अटक


नवी दिल्ली – संयुक्त अरब अमिरातीतून (यूएई) ‘म्हाडा’तील निलंबित उपायुक्त नितीश ठाकूरला अटक करण्यात आली असून भारताने नितीश ठाकूरच्या प्रत्यार्पणासाठी यूएईशी संपर्क साधला असून लवकरच त्याला भारतात आणले जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

२०१५ मध्ये नेपाळ मार्गे बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आरोपी असलेला नितीश ठाकूर यूएईत पळाला होता. त्याने यूएईत हंगामी नागरिकत्व देखील मिळवले होते. त्याच्या व्हिसाची मुदत जून २०१७ मध्येच संपली होती. त्याचे मुदत वाढवून मिळावी यासाठी प्रयत्न सुरु होते. केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी ठाकूरला यूएईतून अटक करण्यात आल्याची माहिती संसदेत दिली. त्याचबरोबर त्यांनी नितीश ठाकूरच्या प्रत्यार्पणाची प्रक्रीया सुरु असल्याचे नमूद केले. दुबई आणि सिंगापूरमध्ये ठाकूरचे नियमित येणे-जाणे होते. त्याचा मुलगा सिंगापूरमध्ये शिकत आहे. ठाकूर दुबईत गुन्हेगारी क्षेत्रातील गुंडांशी संपर्कात आल्याचे सांगितले जाते.

माजी उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर यांच्याविरोधात कोट्यवधी रुपयांची अपसंपदा गोळा केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी यानंतर नितीश ठाकूरला अटक केली होती. पण त्याला काही महिन्यांमध्येच जामीन मिळाला. नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत नितीश ठाकूर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सरकारी वकिलांनी २०१३ मध्येच ठाकूरचा जामीन रद्द करावा आणि त्यांचा पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याची मागणी देखील केली. नितीश ठाकूरने याच दरम्यान देशाबाहेर पळ काढला. इंटरपोलच्या मदतीने भारतातील सुरक्षा यंत्रणांनी नीतीश ठाकूरविरोधात रेड कॉर्नर नोटीसही काढली होती. गेल्या वर्षी नितीश ठाकूरच्या भावालाही अटक करण्यात आली होती.