आपल्या घराला बनवा ‘ चाइल्ड प्रूफ ‘


जर आपल्या घरामध्ये लहान मुले असतील, तर घरामध्ये खेळणे, धावाधाव ही सुरूच असते. अश्यावेळी खेळण्याच्या नादामध्ये आपल्याच तंद्रीत असणाऱ्या या लहानग्यांना आपल्या घरामधील काही वस्तूंच्या मुळे इजा होण्याचा संभव असतो. मुलांना अनेक वस्तूंचे कुतूहल असते. नवीन काहीतरी दिसले, की ते हाताळून पाहण्याची इच्छा देखील असते. या कुतुहलापायी मुलांनी हातामध्ये उचललेल्या काचेच्या वस्तू फुटून त्यांना इजा होण्याचा धोका असतो. तसेच क्वचित स्वयंपाकघरामध्ये काडेपेटी, सुरी असल्या वस्तू मुलांच्या हाती लागणे देखील धोकादायक ठरू शकते. अश्या वेळी, घरात लहान मुले असतील, तर आपले घर ‘चाइल्ड प्रूफ’ करण्याची आवश्यकता आहे. या साठी काही लहान लहान गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. ही खबरदारी घेतल्याने घरामध्ये मुले वावरत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होण्याचा धोका पुष्कळ अंशी कमी होऊ शकतो.

आपल्या घरामध्ये असलेल्या फर्निचरच्या टोकदार कोपऱ्यांमुळे मुलांना इजा होऊ शकते. त्यामुळे फर्निचर निवडताना त्यांचे कोपरे गोलसर असतील असे पाहावे. तसेच घरातील शोभेच्या वस्तू जर काचेच्या असतील, तर त्या मुलांच्या हाताला सहज लागणार नाहीत अश्या ठेवा. घरामध्ये मुळे ज्यावर चढू शकतील असे फर्निचर असेल, तर ते भिंतींना टेकवून ठेवावे.

स्वयंपाकघरामध्ये येऊन भांड्या-कुंड्यांशी खेळणे, मुलांना विशेष आवडते. भांडी ठेवायच्या कपाटांपर्यंत मुलांचे हात पोहोचू लागले, की ती कपाटे उघडून मुले सतत काही ना काही उद्योग करीत असतात. अश्या वेळी मुलांच्या हाताला जी भांडी लागतील, ती जड नसतील याची काळजी घ्यावी, तसेच भांड्यांच्या कडांना धार नसेल त्याची काळजी घ्यावी. मुलांचा हात ओट्याशी पोहोचत असेल, तर त्यावर गरम भांडी ठेवण्याबाबत काळजी घ्यावी. जर ओव्हन ओट्याजवळ असेल तर त्याला लॉक लावायला विसरू नका. ड्रॉवर्स ना देखील सेफ्टी लॉक लावा.

घरातील खिडक्यांच्या जवळ मुले सहज चढू शकतील अश्या वस्तू ठेऊ नका. त्याच बरोबर बाल्कनीच्या कठड्यांवर मुले चढणार नाहीत याची काळजी घेण्याकरिता त्याला जाळी लावून घ्या. बाथरूममध्ये मुलांना पाण्यामध्ये खेळणे खूप आवडते. त्यामुळे मुले बाथरूम मध्ये आंघोळीसाठी जाण्याआधी बाथरूम मध्ये नॉन स्लीप मॅट घाला, व त्यावर उभे राहण्यास मुलांना सांगा. साबण, शँपू, बाथरूम धुण्यासाठी वापरले जाणारे साहित्य मुलांच्या हाताला लागणार नाही अश्या बेताने ठेवा.

Leave a Comment