शरीरामध्ये रक्ताभिसरण सुरळीत न होणे, हे अनके विकारांचे लक्ष असू शकते. लठ्ठपणा, मधुमेह, उच्चरक्तदाब, आणि सातत्याने धूम्रपान या कारणांमुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. या सर्व कारणांमुळे रक्त प्रवाह ज्या धमन्यांमधून होतो, त्या धमन्या आकुंचन पावतात, आणि रक्तप्रवाहाला अडथळे निर्माण होऊ लागतात. शरीरामध्ये रक्तप्रवाह सुरळीत असेल, तर सर्व अवयवांना व्यवस्थित रक्तपुरवठा होतो, व त्यांमुळे अवयव व्यवस्थित काम करू शकतात. जर रक्ताभिसरण सुरळीत नसेल, तर त्याचे दुष्परिणाम किडनी, हृदय आणि मेंदूवर होऊ शकतात. शरीरामध्ये जर रक्ताभिसरण सुरळीत होत नसेल, तर त्याची काही लक्षणे दिसून येतात.
शरीरामध्ये रक्ताभिसरण सुरळीत होत नसल्यास…
हातापायांना मुंग्या येणे, किंवा सतत झिणझिण्या येणे, हे हातापायांमध्ये रक्ताभिसरण सुरळीत होत नसल्याचे लक्षण आहे. तसेच रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये चरबी जमा झाल्याने पोटाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात. पचनसंस्थेशी निगडीत अवयवांमध्ये रक्ताभिसरण सुरळीत होऊ न शकल्याने पचनक्रिया व्यवस्थित होऊ शकत नाही. परिणामी अपचनासारखे विकार उत्पन्न होऊ लागतात, तसेच पोटात दुखणे, पोट बिघडणे, मलातून रक्त पडणे अश्या तक्रारी उद्भवू लागतात. जर अश्या तक्रारी उद्भवू लागल्या तर त्वरित तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यामध्ये इतर तक्रारींसोबत अचानक भूक लागणे कमी होऊ शकते.
शरीरामध्ये प्राणवायू रक्ताभिसरणाच्या माध्यमातून पुरविला जातो. जर रक्ताभिसरण सुरळीत नसेल, तर शरीरातील अवयवांना, स्नायूंना पुरेसा प्राणवायू मिळत नाही. परिणामी भूक न लागणे, सतत थकवा जाणाविणे, हातपाय वारंवार थंड पडणे आणि त्यांमध्ये वेदना होणे अश्या तक्रारी उद्भवू लागतात. तसेच पावलांवर सूज येत असल्यास ही रक्ताभिसरण सुरळीत नसल्याचे समजावे. क्वचित पोट फुगत असेल, तर हा ही रक्ताभिसरण सुरळीत नसण्याचा संकेत आहे.
हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत होत नसले, तर ‘ अँजिना ‘ नामक कंडीशन उद्भवू शकते. यामध्ये छातीच्या डाव्या बाजूला वेदना होणे, श्वासोच्वासास त्रास होणे अश्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. या पैकी कुठल्याही प्रकारच्या तक्रारी वारंवार उद्भवत असतील, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.