‘ पॅनिक अटॅक ‘ म्हणजे काय? तो कसा रोखता येईल?


विमान प्रवास करीत असताना, हवामान ढगाळ असले, तर क्वचित विमान काहीसे हादरते. ही अतिशय सामान्य बाब असली, तरी आता विमान कोसळणार आहे अशी कल्पना करून एखादी व्यक्ती पराकोटीची अस्वस्थ होते. अश्या वेळी त्याच्या हृदयाचे ठोके अचानक जलद होणे, अचानक घामाघूम होणे, छातीत हलक्या कळा येऊ लागणे, हातापायांना मुंग्या आल्याची भावना होणे, आपल्याबाबतीत सर्व काही वाईट घडणार आहे, आहे ती परिस्थिती आपल्या जीवावर बेतणार आहे अशी भावना त्या व्यक्तीला होऊ लागते. ही लक्षणे आहेत ‘ पॅनिक अटॅक ‘ ची. अमेरिकेतील सहा मिलियन पेक्षा अधिक लोक या व्याधीने त्रस्त आहेत.

भारतामध्ये देखील या व्याधीचे प्रमाण वाढताना दिसू लागले आहे. एखाद्या गोष्टीमुळे किंवा घटनेमुळे अतिशय जास्त मानसिक तणाव आल्याने ही लक्षणे उद्भवू शकतात. हा मानसिक तणाव अचानक उद्भवतो. यावेळी एखादी घटना घडण्याच्या अगोदरच त्या घटनेच्या दुष्परिणामांची पराकोटीची कल्पना करून एखादी व्यक्ती अतिशय घाबरून जाते, अस्वस्थ होते. अश्या वेळी या व्यक्तीच्या हृदयाचे ठीके वाढतात, त्यांना अचानक दरदरून घाम फुटतो, हातपाय कापू लागतात. स्वतःच्या जीवाला धोका आहे अशी कल्पनादेखील या व्यक्तींच्या मनामध्ये येऊ लागते. यालाच ‘ पॅनिक अटॅक ‘ असे म्हणतात. हे पॅनिक अॅटक कधीही, कुठे ही उद्भवू शकतात.

एखाद्या व्यक्तीला, काही तरी वाईट घडणार आहे असे वाटून जर पराकोटीची अस्वस्थता जाणवू लागली, तर सर्वप्रथम त्या व्यक्तीला शांत करणे गरजेचे आहे. या वेळी ही व्यक्ती अतिशय जास्त मानसिक तणावाखाली असते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या व्यक्तीशी बोलताना त्याच्या मनावरील तणाव आणखी वाढणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अश्या वेळी त्या व्यक्तीला बसवून दीर्घ श्वासोच्छ्वास करण्यास सांगावे. तसेच हातापायांच्या लहान लहान हालचाली करण्यास प्रवृत्त करावे. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मनावरील ताण काही अंशाने कमी होण्यास मदत होईल.

अस्वस्थ झालेली व्यक्ती थोडी शांत झाल्यावर त्याच्या अस्वस्थतेचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्या व्यक्तीच्या भावनांचा उपहास करू नका. अश्या व्यक्तींशी बोलताना त्यांची मनस्थिती समजावून घेणे अतिशय आवश्यक ठरते. त्यांच्या मनातील भीती फोल ठरविण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात त्या व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment