रंगारंग ‘सुरजकुंड’ मेळ्याला सुरुवात


दर वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये हरियाणा टुरिझम, टेक्स्टाईल्स, पर्यटन, कल्चर आणि एक्स्टर्नल अफेयर्स मंत्रालयांच्या वतीने राजधानी दिल्ली जवळील फरीदाबाद या ठिकाणी सुरजकुंड मेळा आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी हा मेळा दोन फ्रेब्रुवारी रोजी फरीदाबाद येथे सुरु झाला असून, अठरा फ्रेब्रुवारी रोजी या मेळ्याची सांगता होणार आहे. या मेळ्यामध्ये दर वर्षी भारतातील कोणत्याही एका राज्याची संस्कृती, तेथील विशेष खाद्यपरंपरा, हस्तकला आणि त्या राज्याच्या नृत्य आणि संगीतकलेचे दर्शन घडत असते. इतर शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आपली परंपरा, आपली खाद्यसंस्कृती यांचे दर्शन घडण्याचा हा उत्तम पर्याय आहे. ह्या मेळ्याचा आनंद घेण्यासाठी हजारो लोक इथे येत असतात.

यंदाच्या वर्षी हा मेळा उत्तर प्रदेश या राज्याची परंपरा, खाद्यसंस्कृती आणि संगीतकला दर्शविणार आहे. तसेच हर एक राज्याची खासियत दर्शविणारे स्टॉल्स इथे असणार आहेत. या शिवाय वीस अन्य देशांमधील स्टॉल्स देखील यंदा या मेळ्यामध्ये असणार आहेत. सकाळी दहा वाजल्यापासूनच येथे गर्दी दिसून येते. येथे येणारा प्रत्येक जण काही ना काही खरेदी करूनच बाहेर पडत असतो. तसेच प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती दर्शविणारे अनेक स्टॉल्स येथे असून, इथे नाना खाद्यपदार्थांची रेलचेल असते.

या मेळ्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना तिकिटे घ्यावी लागत असून, शनिवार, रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी तिकिटांची किंमत जास्त असते. ही तिकिटे ऑनलाईन देखील बुक करता येऊ शकतात. या वर्षी या मेळ्यामध्ये हँडीक्राफ्ट आणि हँडलूम्स शिवाय येथे असलेल्या मोकळ्या मैदानांमध्ये निरनिराळे संगीताचे, नृत्याचे कार्यक्रम आणि कविता वाचनाचे कार्यक्रम होणार आहेत.

Leave a Comment