भारतात विविध राज्यात विविध प्रकारची पिके घेतली जातात व पिके कापणीला आली की शेतकरी वर्गाची त्यांच्या राखणीसाठी एकाच धावपळ सुरु होते हे नित्याचे दृश्य आहे. राजस्थान राज्यही त्याला अपवाद नाही. येथील एका विशेष पिकाच्या राखणीसाठी शेतकरी कुटुंबासह शेतावर मुक्काम टाकून आहेत तर अनेकांनी राखणीसाठी हायटेक तंत्राचा उपयोग केला असल्याचे दिसून येत आहे. इतक्या काटा काळजीने राखले जाणारे हे पीक आहे अफू.
हायटेक पद्धतीने होतेय या पिकाची राखणदारी
राजस्थानात चितोडगड, उदयपुर, मेवाड, मालवा, हातौडी या भागात अफू शेती केली जाते. अफू पेरल्यापासून ती बाजारात जाईपर्यत त्याची खूप जपणूक करावी लागते. त्यात बोंडे धरायला लागली कि राखण अधिकच काळजीने करावी लागेते. हे शेतकरयाचे नगदी पिक आहे आणि अफूसाठी या पिकांच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात होतात. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सहकुटुंब शेतात मुक्काम टाकला आहे, काही जणांनी शेताभोवती मका पेरून अफू लपवायचा प्रयत्न केला आहे तर काही जणांनी चक्क सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकेही गस्त घालत आहेत.
काही जणांनी सीसीटीव्ही कॅमेरे मोबाईलशी जोडले आहेत. त्यामुळे कुठूनही शेतावर लक्ष ठेवणे शक्य होते आहे. ४ कॅमेरे लावण्यासाठी व जोडणीसाठी २० ते २५ हजार खर्च येतो. वीज पुरवठा नियमित व्हावा म्हणून इन्व्हर्टर लावले गेले आहेत. कॅमेरे एकमेकांशी जोडले आहेत यामुळे एका कॅमेरयाशी छेडछाड झाली तर दुसऱ्या कॅमेऱ्यावर त्याचे चित्रीकरण केले जात आहे असे दिसून येत आहे.