राजधानी दिल्ली येथे उभारले गेलेले अक्षरधाम म्हणजे स्वामी नारायण मंदिर जगातील काही मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे. स्वामी नारायण याच्या स्मृतीप्रीत्यर्थ बांधले गेलेले हे सुंदर मंदिर पर्यटनाचे आवडते केंद्र बनले आहे. या मंदिराची काही खास वैशिष्टे आहेत. या मंदिराला भेट देण्यापूर्वी ती माहिती असतील तर मंदिर पाहताना अधिक आनंद घेता येतो.
दिल्लीच्या अक्षरधाम मधील वैशिष्टे
या मंदिराच्या बांधकामात ११ हजार कुशल कारागिरांनी आणि अन्य कामगारांनी ५ वर्षे मेहनत केली आहे. मंदिराला १० प्रवेशद्वारे आहेत. हे दरवाजे म्हणजे दहा दिशांचे प्रतिक मानले जातात. भारतीय वास्तुकला, संस्कृती आणि परंपरा यांचा अतिशय सुंदर मेळ बांधकामात साधला गेला आहे. या मंदिराची नोंद गीजीज बुकमध्ये झालेली आहे.
या मंदिराच्या चारी बाजूनी नारायण सरोवर आहे. यात १५१ सरोवरांचे पाणी असून १०८ गोमुखे आहेत. ही गोमुखे म्हणजे १०८ हिंदू देवताचे प्रतिक मानले जाते. कमळाच्या आकाराचा प्रचंड बगीचा तयार केला गेला आहे. दोन मजली मंदिरात चारीबाजूनी प्रदक्षिणा मार्ग असून ३ हजार फुटाच्या या मार्गावर १२०० खांब आणि १५५ शिखरे आहेत.
या मंदिरात जगातील सर्वात मोठे यज्ञकुंड आहे. तेही कमळाच्या आकारात आहे. सायंकाळी मंदिरात म्युझिकल फौंटन शो होतो. विविध रंगाच्या लाईट मधून उडणारी कारंजी जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व घटना दर्शवितात. या मंदिरात दररोज हजारोंच्या संख्येने भाविक तसेच पर्यटक येत असतात.