आयकर विभागाची २ लाख जणांना नोटीस


नवी दिल्ली – आयकर विभागाने नोटबंदी दरम्यान आपल्या खात्यात १५ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करणाऱ्या जवळपास २ लाख लोकांना नोटीस बजावली आहे. याबाबत माहिती देताना सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) चेअरमन सुशील चंद्रा म्हणाले, अनेकांनी नोटबंदी दरम्यान आपल्या खात्यात १५ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली होती. त्यानतंर कोणतेही रिटर्न फाइल केले गेले नाही. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आयकर विभागाने अशा जवळपास १.९८ खातेदारांची यादी तयार करुन त्यांना नोटीस बजावली आहे.

एका वृत्तसंस्थेला चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३ महिन्यात टॅक्स चोरी, उशिराने टॅक्स फाइल करणारे आणि हेराफेरी करणाऱ्या जवळपास ३ हजार लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. डिजिटायजेशनला प्रोत्साहन देण्यासाठी आयकर विभाग ई-असेसमेंट (डिजिटल पद्धतीने कर भरणा) यावर भर देत आहे. त्यासाठी यावर्षी प्रायोगिक तत्वावर ई-असेसमेंट केले जात आहे. गेल्या तीन महिन्यात ६० हजार ई-असेसमेंट करण्यात आले. येत्या काळात त्याला अधिक व्यापक स्वरुप देण्यात येईल.

Leave a Comment