या शाळांमध्ये आहे या गोष्टींवर बंदी


शाळा म्हटल्या की नियमावली आली, शिस्त आली. शाळांमध्ये शिस्त पाळली जावी, या करिता अनेक गोष्टी करण्याकरिता मनाई केलेली असते. शाळेमध्ये असताना अनेक कडक नियमांच्या चौकटीत मुलांना आणि शाळेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहावे लागते. नियमांचे पालन करणे ही शाळेमध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यकही आहे. काही देशांमधील शाळांमध्ये कोणकोणत्या गोष्टींवर बंदी घातली गेली आहे, हे जाणून घेऊ या.

न्यूयॉर्क शहरातील ज्यु मुलींसाठी असणाऱ्या एका शाळेमध्ये सोशल मिडिया साईट ‘फेसबुक’चा वापर करण्यास मनाई आहे. ह्या वेबसाईटच्या वापराने मुलींच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होईल असे शाळेच्या प्रशासनाचे मत आहे. तर लंडन शहराच्या पश्चिमी भागामध्ये असलेल्या एका शाळेमध्ये मुलांना ‘ बेस्ट फ्रेंड्स ‘ असण्यावर बंदी आहे. जर मुलांची एकमेकांशी गट्टी जमली, तर यामुळे मुले मानसिक दृष्ट्या कमकुवत होतात असे काहीसे विचित्र मत इथल्या प्रशासनाचे आहे.

आजकाल अतिशय लोकप्रिय असणाऱ्या स्ट्रेचेबल लेगीन्ग्स किंवा जेगिन्ग्स हा प्रकार अमेरिकेतील अनेक शाळांमध्ये मना आहे. ह्या पोशाखाचा प्रकार शाळेमध्ये घालण्याजोगा नसल्यामुळे याला शाळांमध्ये बंदी आहे. लहान मुलांमध्ये पसंत केला जाणारा ‘ डॉज बॉल ‘ हा खेळ देखील अमेरिकेतील काही शाळांनी मना केला आहे. मुलांना या खेळापासून हानी पोहोचण्याचा धोका असे मत मांडत या शाळांनी ह्या खेळावर बंदी घातली आहे. तसेच काही शाळांमध्ये मोबाईल फोन्स आणण्यावर बंदी आहे. काही मुली, आपल्या बूट्स मध्ये मोबाईल लपवून आणत असत, त्यामुळे तश्या प्रकारच्या बूट्स वर देखील अमेरिकेतील शाळांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

उत्तरपत्रिकेवरील लाल शाईमधली शिक्षकांनी काढलेली नक्षी पहिली, की मुलांच्या हृदयाचे ठोके जास्त वेगाने पडू लागतात. पेपरमध्ये किती चुका असतील आणि किती मार्क मिळाले असतील या विचारांनी मुले अस्वस्थ असतात. याच कारणाकरिता ब्रिटन मधील शाळेमध्ये शिक्षकांना लाल शाई वापरण्याची बंदी आहे. लाल शाई बघून मुले अस्वस्थ होतात, त्यांना मानसिक तणाव जाणवतो या कारणासाठी ही बंदी घालण्यात आली आहे.

कनेक्टिकटच्या एका शाळेमध्ये ‘हूड ‘ म्हणजेच टोपी असलेले जॅकेट घालण्यास मनाई आहे. या जॅकेट ला असणाऱ्या टोपीमध्ये मुले मोबाईल फोन लपवत असत. म्हणून ह्या जॅकेट्स वर शाळेमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Comment