पुन्हा बाजारात येणार ह्युंदाईची सॅन्ट्रो !


मुंबई : भारतीय बाजारात एकेकाळी सॅन्ट्रो कारला बरीच पसंती होती. पण ह्युंदाईने या कारचे उत्पादन काही वर्षांपूर्वी बंद केले. पण ह्युंदाई एका नव्या हॅचबॅक कारवर सध्या काम करत असल्यामुळे असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, या कारला सॅन्ट्रो नाव कंपनी देण्याची शक्यता आहे.

ही कार भारतात या वर्षी लाँच केली जाऊ शकते. मारुती अल्टो, डॅटसन रेडी-गो आणि रेनॉल्ट क्विडसोबत या कारची स्पर्धा असणार आहे. भारतीय कार बाजारात ह्युंदाईच्या सॅन्ट्रोने बरच यश संपादन केले होते. ही ह्युंदाईची पहिली हॅचबॅक कार होती. १९९८ साली ह्युंदाईने भारतात या कारसोबतच एंट्री केली होती. १९९८ साली लाँच झालेल्या सॅन्ट्रो कारने २०१४ पर्यंत आपली जादू कायम ठेवली होती. १६ वर्षाच्या कालावधीत कंपनीने सॅन्ट्रोच्या तब्बल १६ लाख युनिटची विक्री केली होती. मारुती सुझुकीच्या अल्टो ८०० आणि वॅगन आरशी त्यावेळी या कारची स्पर्धा होती.

दरम्यान, ग्रँड आय-१० आणि एलीट आय-२० या कार ह्युंदाईने लाँच केल्यानंतर सॅन्ट्रोचे उत्पादन २०१४ साली बंद केले. पण ग्राहकांकडून या कारविषयी कायमच विचारणा होत असल्याने कंपनी पुन्हा एकदा सॅन्ट्रो कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. या वृत्ताला ह्युंदाईचे सीईओ वायकेकू यांनी दुजोरा दिला आहे. सॅन्ट्रो कार नव्या हॅचबॅकसह पुन्हा बाजारात आणण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Leave a Comment