फ्लिपकार्टने ५५ हजाराच्या आयफोनच्या जागी दिला ५० रुपयाचा कपड्याचा साबण!


मुंबई : एका २६ वर्षीय तरुणाला फ्लिपकार्टवरुन ऑनलाईन शॉपिंग करणे चांगलेच महागात पडले आहे. कारण, फ्लिपकार्टवरुन ५५ हजाराच्या आयफोन ८ त्या तरुणाने मागवला होता. पण त्याला कंपनीने चक्क ५० रुपयाचा कपड्याचा साबण पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे.

फ्लिपकार्टवरुन मुंबईत राहणाऱ्या 26 वर्षीय तबरेज मेहबूब नागरली या सॉफ्टवेअर इंजिनियरने आयफोन ८ मागवला होता. त्याने त्यासाठी कंपनीला ५५ हजार रुपयांचे पेमेंटही केले होते. पण त्याला २२ जानेवारी रोजी डिलीवरी मिळाली, त्यावेळी बॉक्स फोडून पाहिल्यावर त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण, कंपनीने, ५५ हजाराच्या आयफोनच्या बदल्यात त्याला ५० रुपयाचा कपड्याचा साबण पाठवला होता. तबरेजने या प्रकारानंतर फ्लिपकार्टविरोधात भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरुन फ्लिपकार्ट विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, कंपनीने या प्रकरणी चौकशी सुरु केली असल्याची माहिती फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने दिली. वास्तविक, फ्लिपकार्टवरुन मागवलेल्या वस्तूंच्या बदल्यात ग्राहकांना भलतीच वस्तू मिळण्याची ही पहिलीच घटना नाही. कंपनीवर यापूर्वीही असे अनेकवेळा आरोप झाले आहेत.

Leave a Comment