‘ग्रीन टी’चे फायदे आणि तोटे


गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्य वर्धनासाठी ग्रीन टी चा वापर लोकप्रिय होत आहे. आज बाजारामध्ये अनेक नामांकित ब्रँडचे ग्रीन टी उपलब्ध आहेत. अनेक लोकांनी या ग्रीन टी चा समावेश आपल्या दैनंदिन आहारामध्ये केलेला आहे. रोज घेतल्या जाणाऱ्या चहा किंवा कॉफीची जागा आता ग्रीन टी ने घेतली आहे. ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी तत्वे, यामुळे याचा वापर वाढताना दिसत आहे. पण तरीही ग्रीन टी चे सेवन कितपत योग्य आहे, किंवा याचा वापर आणखी कुठल्या प्रकारे करता येईल, याचे काही दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट तर नाहीत, याचा विचार होणे देखील अगत्याचे आहे.

ग्रीन टी चा वापर वजन कमी करण्यासाठी केला जातो. विशेषतः भरपूर कॅलरीज-युक्त असा आहार घेतल्यानंतर ग्रीन टी पिण्याचा सल्ला तज्ञ देतात. ग्रीन टी मध्ये एपीगॅलोकॅटेचिन गॅलेट, म्हणजेच EGCG हे तत्व असते. हे तत्व वजन वाढण्याला अटकाव करते, व वाढलेले वजन घटविण्यास मदत करते. ग्रीन टी च्या एका कपमध्ये केवळ दोन कॅलरीज असतात. त्यामुळे आपण नेहमी घेत असलेल्या चहा किंवा कॉफीच्या ऐवजी ग्रीन टी चा समावेश आपल्या आहारामध्ये करणे फायद्याचे ठरू शकते.

ग्रीन टी च्या सेवनाने कोलेस्टेरोल कमी होत असल्याने ह्याचे सेवन हृदयाच्या आरोग्याकरीता देखील चांगले आहे. ग्री टी मध्ये असलेल्या गुणकारी तत्वांमुळे हृदयाला होणारा रक्तप्रवाह सुरळीत राहतो. त्यामुळे उच्चरक्तदाबासारखे विकार टाळण्यास मदत होते. ग्रीन टी च्या सेवनाने मेंदू जास्त सजग राहतो. तसेच याच्या सेवनामुळे अल्झायमर सारखे विकार होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो. ग्री टी च्या सेवनाने ब्लड ग्लुकोज लेव्हल्स नियंत्रणात राहतात, व ह्याच्या सेवनाने मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.

ग्रीन टी चा वापर पेय म्हणून करण्यासोबतच, इतर अनेक कारणांसाठी ह्याचा वापर आपण करू शकतो. ग्रीन टी ची पूड आणि साखर हे मिश्रण एक उत्तम फेस स्क्रब म्हणून वापरता येते. ग्री टी उत्तम टोनर आहे. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी याचा वापर करता येतो. जर डोळ्यांच्या खाली काही कारणाने सूज आली असले, तर ग्रीन टीच्या ओल्या टी बॅग्स डोळ्यांवर ठेवल्याने सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ग्रीन टी पिण्यासाठी वापरलेल्या टी बॅग्स चा पुन्हा वापर करता येतो. ग्रीन टी उकळून घेतलेल्या पाण्याने केस धुतल्याने केस चमकदार, मुलायम होतात.

ग्रीन टी चे जसे अनेकविध फायदे आहेत, तसेच याचे काही तोटे देखील आहेत. ग्रीन टी मध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये टॅनिन्स आहेत. यामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्या आहारामधील लोह शोषले जाऊ शकत नाही. त्यामुळे जेवण झाल्यानंतर त्वरित ग्री टी न पिता साधारण तासाभराने याचे सेवन करावे. ग्रीन टी चे सेवन अधिक असेल तर यामुळे दात पिवळसर दिसायला लागतात. त्यामुळे दातांची निगा राखणेही तितकेच आवश्यक आहे. जर तुम्ही ‘कॅफिन सेन्सिटिव्ह’ असाल. तर ग्रीन टी च्या अतिसेवनामुळे तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. पण तरीही नेहमीच्या चहा किंवा कॉफीच्या सेवानापेक्षा ग्रीन टी चे सेवन कधीही चांगले इतके मात्र नक्की.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment