फेसबुकवरच्या ‘रिकामटेकड्यां’मध्ये चक्क घट…


फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने आपल्या वेबसाईटमध्ये केलेल्या सुधारणांमुळे लोक या साईटवर कमी वेळ घालवत आहेत. खुद्द झुकेरबर्गनेच ही कबुली दिली आहे.

फेसबुकच्या सामग्रीत केलेले बदल हे दर्शवितात, की वापरकर्त्यांनी या सामाजिक नेटवर्कवर खर्च केलेल्या एकूण वेळेत 5टक्के घट झाली आहे, असे फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या झुकेरबर्गने गुंतवणूकदारांना सांगितले.

कंपनीच्या चौथ्या तिमाहीचा कमाई अहवाल बुधवारी प्रकाशित करण्यात आला. या अहवालासोबत प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात झुकेरबर्गने म्हटले आहे, की “एकूणच आम्ही जे बदल केले त्यामुळे फेसबुकवर प्रत्येक दिवशी सुमारे 5 कोटी तास कमी खर्च करण्यात आले.”

न्यूज फीडमध्ये कमी व्हायरल व्हिडीओ प्रदर्शित करण्याच्या निर्णयामुळे घट झाली आहे, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच, अमेरिका आणि कॅनडामध्ये दैनिक वापरकर्त्यांमध्येही फेसबुकने पहिल्यांदाच घट नोंदविली आहे. या भागात मागच्या तिमाहीत 18 कोटी 50 लाख वापरकर्ते होते, ते या तिमाहीत 18 कोटी 50 लाखापर्यंत कमी झाले आहेत.

या महिन्यात फेसबुकने वापरकर्त्यांना न्यूज फीडमध्ये ब्रँड व प्रकाशकांच्या मजकुरापेक्षा मित्रांकडून अधिक माहिती दाखविण्याची घोषणा केली. विशेषतः वापरकर्त्यांनी टिप्पणी किंवा शेअर न करता पाहिलेल्या किंवा वाचलेल्या सामग्रीवर झुकेरबर्गचा कटाक्ष होता.

Leave a Comment