कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताना अशी घ्या काळजी


पूर्वीच्या काळी दृष्टीदोष सुधारण्यासाठी चष्मा लावण्यावाचून इतर कोणताही पर्याय नसे. पण सध्याच्या काळामध्ये उपलब्ध असलेल्या कॉन्टॅक्ट लेन्सेस मुळे दृष्टीदोष असणाऱ्या व्यक्तींच्या समस्या पुष्कळ अंशी कमी कमी झाल्या आहेत. तसेच आपल्या डोळ्यांचा हवा तसा रंग मिळविण्यासाठी लेन्सेसचा वापर केला जातो. ह्या लेन्सेस वापरताना त्या काळजीपूर्वक वापरणे गरजेचे आहेच, शिवाय त्यांची योग्य निगा राखणे देखील गरजेचे आहे. अन्यथा लेन्सेसद्वारे डोळ्यांमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका उद्भवू शकतो.

जर लेन्सेसची योग्य निगा राखली गेली नाही, त्या अस्वच्छ ठेवल्या गेल्या तर त्यांच्या द्वारे डोळ्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे यामध्ये कॉर्नीयाला इन्फेक्शन होते, त्याला केरटायटीस असे म्हटले जाते. जर हे इन्फेक्शन वेळीच आटोक्यात आणले गेले नाही, तर डोळ्यांचे कायमचे नुकसान होऊन कॉर्नियल ट्रान्सप्लांट करण्याची वेळ येऊ शकते.

स्वीमिंग पूल मधील पाणी, नळाचे पाणी या मध्ये अनेक तऱ्हेचे जीवाणू असतात. ह्या जीवाणूंच्या मुळे लेन्सेस दूषित होऊ शकतात. त्यामुळे पोहताना लेन्सचा वापर शक्यतो करू नये. तसेच नळाच्या पाण्यामध्ये देखील अनेक जीवाणू असल्याने या पाण्याने लेन्सेस धुवू नयेत. लेन्सेस साफ करण्यासाठी विशिष्ट क्लिनिंग सोल्युशन उपलब्ध असते, केवळ त्याचाच वापर करावा.

माती, झाडे, किंवा पाण्यामध्ये असलेल्या बॅक्टेरियांमुळे देखील लेन्सेस इंफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे माती किंवा झाडे हाताळल्यानंतर लेन्सेसला स्पर्श करणे टाळावे. तसेच लेन्स जर आधीपासून क्लीनिंग सोल्युशन मध्ये घातलेल्या असतील, तर आधीच्या सोल्युशनमध्ये पुन्हा वरून सोल्युशन घालणे टाळावे. आधीचे सोल्युशन पूर्ण ओतून देऊन, मग नव्या सोल्युशन मध्ये लेन्सेस घालून ठेवाव्यात. लेन्सेस एक्सपायर झाल्यानंतर त्या वापरणे टाळावे. तसेच लेन्सेस घालून झोपणे आवर्जून टाळायला हवे. झोपताना लेन्सेस घातल्या तर त्यामुळे कॉर्नियाला नुकसान होऊ शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment