केवळ हिमनगाला टकरावल्याने नाही बुडाली टायटॅनिक…!


१९१४ साली, जगातील सर्वात मोठी समजली जाणारी ‘क्रुझ शिप’ टायटॅनिक आपल्या पहिल्या वहिल्या सफरीच्या दरम्यान एका विशाल हिमनगाला धडकली. त्या जोरदार धडकेमुळे बोटीला मोठी भगदाडे पडली. त्या भोकांमधून पाणी बोटीमध्ये शिरू लागले, आणि हिमनगाला धडकल्यापासून काहीच तासांच्या अवधीमध्ये ह्या विशालकाय बोटीला जलसमाधी मिळाली. या बोटीबरोबर सुमारे पंधराशे प्रवाश्यांना आपले प्राण गमवावे लागले. लाईफ बोट्स च्या सहाय्याने काही सुदैवी प्रवासी वाचले, पण बहुतांशी लोक दुर्दैवी ठरले. टायटॅनिक बोटीला मिळालेली जलसमाधी ही इतिहासामधील सर्वात भयावह दुर्घटना ठरली.

या घटनेचे वर्णन करणाऱ्या अनेक डॉक्यूमेंटरिज् , शोधाभ्यास, पुस्तके आणि या घटनेवर आधारित चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. या सर्वांमध्ये टायटॅनिक ला झालेला अपघात हा, हिमनगाशी न टाळता आलेली धडक या कारणामुळे झाला असल्याचे स्पष्ट केले गेले आहे. मात्र नुकत्याच केल्या गेलेल्या एका शोधाभ्यासामध्ये काही नवीन तथ्ये उघड झाली आहेत. त्या तथ्यांच्या अनुसार, केवळ हिमनगाशी झालेली धडक हे टायटॅनिक बुडण्याचे एकमेव कारण नव्हते. तसे स्पष्ट करणारा नवा पुरावा शोधकर्त्यांच्या हाती लागला आहे. त्यांच्या मते टायटॅनिक हिमनगाला धडकल्याने बुडाली, कारण टायटॅनिक त्यामध्ये लागलेल्या आगीमुळे कमकुवत झाली होती.

टायटॅनिकमधील बॉयलर रुमच्या पाठीमागे असलेल्या इंधन, म्हणजेच कोळसा साठवण्याच्या खोलीमध्ये काही कारणाने आग लागली. सुमारे तीन आठवडे ही आग जळत राहिली. ही आग जळत असल्याचे टायटॅनिक वरील कर्मचाऱ्यांना तहूक होते, पण आग किरकोळ आहे असे वाटून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ह्या आगीमुळे टायटॅनिक च्या मजबूत लोखंडाने बनलेल्या भिंती देखील कमजोर झाल्या. आणि ज्यावेळी टायटॅनिक हिमनगाला धडकली त्यावेळी तो आघात सहन न होण्याइतकी ती कमकुवत झालेली होती. तो आघात होताक्षणीच त्या विशालकाय बोटीच्या भिंती कागद फाटावा तितक्या सहजी फाटल्या आणि बोटीमध्ये वेगाने पाणी भरू लागले.

टायटॅनिक बोटीचे अवशेष सापडल्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या यंत्रांद्वारे बोटीच्या अवशेषांचे आणि बोटीच्या अंतर्भागाचे छायाचित्रण केले आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातूनच ही नवीन तथ्ये शास्त्रज्ञांच्या समोर आली आहेत. याच तथ्यांच्या आधारे शास्त्रज्ञांनी, टायटॅनिक बोटीमध्ये आग लागली असल्याचे, व ते लक्षात येऊनही याबद्दल कोणीही आग विझविण्यासाठी कसलेच प्रयत्न न केल्याने, ही आग काही दिवस जळत राहिली व त्यामुळे बोट कमकुवत झाली असल्याचे निदान केले आहे.

Leave a Comment