या बॉलीवूड सिताऱ्यांना आहे स्वयंपाकाची आवड…


बॉलीवूड मधील काही सुपरस्टार्स त्यांच्या उत्तम अभिनय कौशल्या करिता ओळखले जातात. पण त्यांच्या या कौशल्याशिवाय हे कलाकार पाक कला निपुण देखील आहेत. जेव्हा आणि जसा मोकळा वेळ मिळेल, तेव्हा स्वयंपाकघरामध्ये जाऊन सर्वांचे मनपसंत पदार्थ बनविणे आणि कौतुकाने खाऊ घालणे यांना खूप आवडते. बॉलीवूडचा ‘ सिंघम ‘ अजय देवगण याला स्वयंपाकाची आवड आहे हे त्याच्या फार कमी चाहत्यांना ठाऊक असेल. पण अजय साठी, स्वयंपाक करणे हे मनावरील ताण कमी करण्याचे प्रभावी माध्यम आहे. अगदी चायनीज पदार्थांपासून ते मुघलाई पदार्थांपर्यंत सर्व पदार्थ बनविण्यामध्ये अजयचा हातखंडा आहे.

ऐश्वर्या राय बच्चन ही अतिशय गुणी अभिनेत्री आहेच, पण त्या जोडीने ती एक आदर्श पत्नी, आई आणि गृहिणी आहे. त्याचबरोबर पाककलेत देखील ऐश्वर्या निपुण आहे. निरनिराळे पदार्थ बनविण्यात ऐश्वर्याचा हातखंडा आहे. गोड पदार्थ बनवायला ऐश्वर्याला आवडते. तसेच खाद्यपदार्थ बनविताना सतत नवनवीन प्रयोग करून पाहणे देखील ऐश्वर्याला आवडते. पत्नी ऐश्वर्या प्रमाणेच अभिषेक बच्चन ला देखील स्वयंपाकाची आवड आहे. चिकन चे निरनिराळे पदार्थ बनविण्यात अभिषेकचा हातखंडा आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला स्वयंपाकाची आवड आहेच, आणि तिची ही आवड तिने एका कुक शो च्या माध्यमातून दर्शकांच्या समोर आणली आहे. शिल्पाला जेवण बनविणे आणि चवीने जेवणे या दोन्ही गोष्टी मनापासून आवडतात. अभिनेता अक्षय कुमार अभिनय क्षेत्रात येण्याआधी बँकॉक च्या एका हॉटेल मध्ये शेफ म्हणून कार्यरत होता. आता तो त्याचा व्यवसाय नसला, तरी त्याची स्वयंपाकाची आवड मात्र आजही टिकून आहे. आज ही सवड मिळाली की अक्षय स्वयंपाकघरामध्ये निरनिराळे पदार्थ बनविताना दिसतो. त्याला देखील गोड पदार्थ बनविणे जास्त आवडते. अक्षयच्या घरी त्याचे परिवारजन किंवा मित्रमंडळी मेजवानीसाठी गोळा झाली, की त्यांच्या साठी निरनिराळे पदार्थ बनविणे अक्षयला आवडते.

करीना कपूर खानला शाकाहारी पदार्थ बनविण्याची आवड आहे. आपले परिवारजन आणि मित्रमंडळी यांच्या सोबत एकत्र मेजवानी आयोजित करणे आणि त्या सर्वांसाठी निरनिराळे पदार्थ बनविणे करीनाला आवडते. ‘ क्वीन ‘ कंगना रानौत हिला ‘ पहाडी ‘ पदार्थ बनविण्याची खूप हौस आहे. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना संपूर्ण टीम करिता स्वयंपाक बनविणे देखील कंगनाला मनापासून आवडते.

Leave a Comment